नवी मुंबई : महापालिका नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांच्या कार्यपद्धतीविषयी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करताना महापालिका प्रशासनातील अधिकारी वर्गातूनच सक्षम अधिकाऱ्याला नगर रचना विभागातील कार्यकारी अभियंता या पदाचा कार्यभार देण्याची लेखी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना तातडीने पदभार देत असताना पालिकेतील रिक्त पदावर पालिकेतील कार्यरत अधिकाऱ्यांचीच वर्णी लावावी. कारण तो त्यांचा हक्कच असल्याची प्रतिक्रिया कामगार नेते रविंद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.
संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयानुसार नवी मुंबई महानगरपालिकेचा आकृतीबंध तथा सेवा भरती नियमावली मंजूर करण्यात आलेली आहे. उपरोक्त नियमावलीनुसार नगररचना विभागासाठी कार्यकारी अभियंता हे पद निर्माण करण्यात आलेले आहे. या पदावर सद्यस्थितीत मा. आयुक्त यांच्या संदर्भ क्र. २ मधील आदेशाअन्वये आपणाकडून पालिकेच्या एका अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. परंतु सहाय्यक संचालक, सोमनाथ केकाण यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना करुन संबंधित अधिकाऱ्यांस कार्यकारी अभियंता पदाचे कामकाज देण्यास नकार दिलेला असून हे कार्यकारी अभियंता पद वैध नसल्याबाबत प्रशासन विभागास कळविले आहे. स्वत: नगररचनाकार असूनसुद्धा गेली अनेक वर्षे सहाय्यक संचालक पदी कार्यभाराने नियुक्त असलेल्या ह्या अधिकाऱ्यास महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे महत्व कळू नये हे दुर्दैवी आहे. या प्रकरणाची दखल घेवून आपल्या अदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केकाण यांना द्यावेत अशी विनंती कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेत नियुक्त करावयाच्या उप- आयुक्त संवर्गातील ६ जागा रिक्त आहेत. ह्या जागांवर नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेतील सहाय्यक आयुक्त तथा समकक्ष संवर्गातील अधिकाऱ्याची प्राधान्याने व विनाविलंब नियुक्ती करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यांस दि. ५ जुन २०२३ रोजी नगर रचना विभागावर कार्यकारी अभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. परंतु आजतागायत आपणच दिलेल्या आदेशाची महापालिका प्रशासनामध्ये अंमलबजावणी केली जात नाही. राज्य सरकार प्रतिनियुक्तीवर महापालिका प्रशासनात अधिकारी पाठवते, त्यांना तात्काळ रुजू करून घेतले जाते, त्यांना लगेचच पदभारही दिला जातो. परंतु महापालिका प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांनी पत्र देवूनही पदभार भेटत नाही. आपल्या पालिका प्रशासनात काम करणाऱ्यांना पद भेटत नाही म्हणजेच प्रतिनियुक्तीवरच्या अधिकाऱी तुपाशी आणि आपल्या पालिकेतील अधिकारी उपाशी हा संतापजनक प्रकार आहे. आपल्याच आदेशाला पालिका प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने आपल्या कार्यक्षमतेवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे चित्र चांगले नसल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यावेळी म्हणाले.