नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६,८,१०, तसेच सारसोळे गाव व कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा संकलनासाठी प्लास्टिकचे डब्बे उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ६,८,१०, तसेच सारसोळे गाव व कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कचरा संकलनासाठी असलेल्या प्लास्टिक डब्यांची समस्या गंभीर झाली आहे. महापालिका प्रशासनाने गृहनिर्माण सोसायट्यांना २०१५-१६ मध्ये गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा संकलनासाठी प्लास्टिकचे डब्बे वितरीत केले होते. या घटनेलाही आता सात-आठ वर्षाचा कालावधी लोटला आहे. पालिका प्रशासनाने दिलेले डब्बे आज तुटले आहेत. कचरा संकलनासाठी महापालिकेची गाडी आल्यावर ते कचरा डब्बे प्रवेशद्वारावर आणताना कचरा सांडला जातो. तो कचरा डब्बे गाडीत टाकताना कचरा रस्त्यावर पडतो. सोसायटी आवारात व सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरलेली असते. बकालपणा येतो. रहीवाशांमध्ये आजार पसरतात. हे चित्र नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी भूषणावह नसल्याचे सांगत महादेव पवार यांनी निवेदनातून नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. परंतु तुटलेल्या, मोडकळीस आलेल्या सोसायटी आवारातील कचरा संकलनाच्या डब्यामुळे या अभियानाला मर्यादा पडतात. महापालिका प्रशासनाच्या तिजोरीत करोडो रूपयांच्या ठेवी असणे प्रशंसनीय नाही तर करदात्या नागरिकांना सुविधा मिळणे प्रशंसनीय आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा संकलनासाठी महापालिका प्रशासनाने प्लास्टिकचे डब्बे उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. निविदा निघाली नाही असे सांगत पालिका प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा संकलनासाठी प्लास्टिकचे नवीन डब्बे मिळाल्यास कचरा सांडणार नाही. प्रवेशद्वाराच्या आतील व बाहेरील भागात कचरा पडलेला दिसणार नाही. परिसर स्वच्छ दिसेल, बकालपणा संपुष्ठात येईल. आपण नेरूळ सेक्टर ६,८,१०, तसेच सारसोळे गाव व कुकशेत गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा संकलनासाठी प्लास्टिकचे डब्बे उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.