मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह पालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे तक्रार
नवी मुंबई : कुकशेत गावात पामबीच मार्गावर समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर सुरू असलेले प्लॉट क्रं आर/३/ए, सेक्टर १४ मध्ये रिजेन्सी इंक बिल्डरच्या टॉवरचे बांधकाम तातडीने थांबवून उपाययोजना केल्यावरच बांधकाम सुरु करण्यास परवानगी देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा सचिव महादेव पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळमध्ये पामबीच मार्गावर समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर कुकशेत गावामध्ये सुरू असलेले प्लॉट क्रं आर/३/ए, सेक्टर १४ मध्ये रिजेन्सी इंक बिल्डरच्या बांधकामामुळे समस्या निर्माण झाल्या असून स्थानिक रहीवाशांच्या आरोग्याला तसेच जिवितास धोका निर्माण झाला असल्याने निवेदनातून समस्येचे गांभीर्य महादेव पवार यांनी मुख्यमंत्री व महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पामबीच मार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर सकाळी व संध्याकाळी शेकडोच्या संख्येने नेरुळमधील रहीवाशी चालण्यासाठी ये-जा करत असतात. या रिजेन्सी इंकच्या टॉवरच्या सुरु असलेल्या बांधकामामुळे या रहीवाशांना खुपच त्रास गेल्या आठ-दहा दिवसापासून होवू लागला आहे. या टॉवरच्या बांधकामातून धुळ, माती, छोटे दगडी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या माणसांच्या अंगावर पडत आहे. धुराळ्याने लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. आज स्थानिक रहीवाशांच्या संयमाचा उद्रेक झाला आहे. लोकांनी बांधकाम स्थळी आत घुसून काम थांबविण्याची व संबंधितांना समज देण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी असणारे लोक मुजोर असून ते लोकांना जुमानत नव्हते. तसेच बिल्डर अथवा बिल्डरच्या संबंधित अधिकाऱ्याचा फोन नंबरही कोणाला देत नव्हते. या धुराळ्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने व लोकांना सकाळी येथून चालणे अवघड झाल्याने लोक तेथील मजुरांना मारण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
आम्ही व आमच्या समवेत या मार्गावर चालणाऱ्या सर्वच लोकांनी आतमध्ये जावून धुळीचा शोध घेतला असता टॉवरच्या मध्यभागी वरून जो कचरा, वाळू टाकली जाते, तो ड्रम पूर्णपणे तुटला असून ती माती, धुळ थेट तळमजल्यावर जमिनीवर पडत आहे. त्याचा धुराळा बाहेर चालणाऱ्या रहीवाशांना सहन करावा लागत आहे. बिल्डरला व त्याच्या माणसांना सकाळ-संध्याकाळ या मार्गावर चालणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी, जिविताशी काहीही देणेघेणे नाही. गेल्या आठ दिवसापासून स्थानिक रहीवाशांना खुप त्रास होत आहे. ही धुळ, धुराळा सेक्टर सहामध्येही पसरत आहे. आपण तातडीने हे बांधकाम थांबविण्याचे निर्देश देवून बिल्डरला धुराळा, धुळीवर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत. धुळ, माती खाली टाकणारा ड्रम नव्याने बसविण्यात यावा. बांधकामे झाली पाहिजेत, पण सभोवतालच्या लोकांच्या आरोग्याला धोका होता कामा नये ही आमची भूमिका आहे. आपण सकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास येवून तेथील लोकांशी चर्चा केल्यास आपणास या त्रासाचा लोकांना होणारा त्रास व गांभीर्य समजेल, अशी भीती महादेव पवार यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
आपण या धुराळ्याचा त्रास पाहता हे बांधकाम तातडीने थांबविण्याचे बिल्डरला आदेश देवून नोटीस काढावी व पुरेशी उपाययोजना झाल्यावर पुन्हा बांधकाम सुरू करण्याची परवानगी द्यावी असे महादेव पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.