. नवी मुंबईच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे
. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करू नका
. नवीन पाणी योजनांना गती द्या
. मोरबे धरण, सिडको आणि . एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना तातडीने कायमस्वरूपी नोकऱ्या द्या
. शिक्षक भरतीतील घोटाळा बाहेर काढू
. पालिकेच्या विधी विभागाची पुनर्रचना करा
. वंडर्स पार्कचे दर वाढवायचे नाही
. दिघा तलावाचे सुशोभीकरण थांबविणार्यांना इशारा
… तर ऐरोली-काटई उड्डाणपुलाचे काम बंद पाडून
नवी मुंबई : नवी मुंबईतील समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसेच पालिका स्तरावरील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी लोकनेते आमदार गणेश नाईक महापालिका आयुक्तांबरोबर मागील साडेतीन वर्षे नियमित बैठका घेत आहेत. मंगळवारी (दि. ५ डिसेंबर) ७५ वी बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीला लोकनेते आमदार नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, भाजपाचे नवी मुंबई माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष माधुरी सुतार, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेढकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय झाले.
नवी मुंबईच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे
नवी मुंबई महापालिकेला एमआयडीसीच्या बारवी धरणातून मिळणारा हक्काचा पाणीसाठा मिळत नाही. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये पाणीटंचाई असताना सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या भागात पालिकेच्या मोरबे धरणातून ८० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो
नवी मुंबई शहराला हक्काचा पाणीपुरवठा झाला पाहिजे, असे लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या बैठकीत स्पष्ट केले. येत्या दोन महिन्यात खारघर आणि कामोठे या क्षेत्रामध्ये सिडको पाणीपुरवठा करणार आहे. त्यामुळे पालिकेचे वाचणारे ८० एमएलडी पाणी नवी मुंबईला परत मिळून पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करू नका
काही भ्रष्ट अधिकारी काही घटकांच्या दडपणाखाली आणि दहशतीखाली येऊन ठराविक प्रभागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत आहेत जेणेकरून येथील लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागेल. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना गर्भित इशारा देत असे करण्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला.
नवीन पाणी योजनांना गती द्या
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वैतरणा आणि भिरा पाणी योजना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी सुचवल्या आहेत. शासनाकडे पाठपुरावा करून या दोन्ही योजनांना गती देण्याची मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याची माहिती आयुक्त नार्वेकर यांनी दिली.
मोरबे धरण, सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना तातडीने कायमस्वरूपी नोकऱ्या द्या
बारवी धरणग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यामध्ये ज्याप्रकारे महापालिका प्रशासनाने तत्परता दाखवली त्याचप्रकारे मोरबे धरण प्रकल्पग्रस्त सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना देखील तातडीने महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी कार्यवाही गतिमान करण्याची मागणी लोकनेते नाईक यांनी बैठकीत केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.
शिक्षक भरतीतील घोटाळा बाहेर काढू
महापालिकेच्या शाळांमधून १८५ ठोक मानधनावरील शिक्षकांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती यापैकी ५० उमेदवारांना पात्र करण्यात आले आहे. या ५० उमेदवारांकडून प्रत्येकी आठ लाख रुपयांची मागणी भरतीसाठी काही घटकांनी केली आहे. एवढी मोठी रक्कम हे गरीब शिक्षक कुठून आणणार? याप्रकरणी आयुक्त नार्वेकर यांच्याकडे या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून शिक्षकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी केली आहे. तसे झाले नाही तर या भ्रष्टाचाराची क्लिप आपण बाहेर काढू, असा इशारा लोकनेते नाईक यांनी दिला.
पालिकेच्या विधी विभागाची पुनर्रचना करा
महापालिकेचे हित जोपासण्यामध्ये अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या विधी विभागाची पुनर्रचना करण्याची मागणी देखील लोकनेते आमदार नाईक यांनी केली. अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी नेमण्याची सूचना केली. महापालिकेला मिळणारे सुविधा भूखंड या कामचुकार अधिकाऱ्यांमुळे हातचे गेल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. सध्याचे विधी विभागातील अधिकारी हे केवळ बिल्डर आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी काम करीत आहेत. वारंवार सांगूनही पालिकेचे सुविधा भूखंड वाचवण्यासाठी कॅव्हेट दाखल करीत नाहीत.
वंडर्स पार्कचे दर वाढवायचे नाही
नवी मुंबईमध्ये करोडो रुपये खर्च करून वंडर्स पार्क या थीम पार्कची निर्मिती करण्यात आली. परंतु या वंडर्स पार्क मधील अनेक राईड नादुरुस्त आहेत. असे असताना आता या वंडर्स पार्कचे प्रवेशाचे दर वाढवण्यात आलेले आहेत. हे दर अजिबात वाढू देणार नाही. वंडर्स पार्क मधील आवश्यक दुरुस्ती करून आहे त्याच दरामध्ये सर्वसामान्यांसाठी हे थीम पार्क सुरू ठेवावे, अशी मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली.
कुणाच्यातरी दबावाखाली दिघा तलावाचे सुशोभीकरण थांबविणाऱ्यांना इशारा
दिघा येथील तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकनेते आमदार नाईक यांनी ५० लाख रुपयांचा आमदार निधी दिलेला आहे. परंतु काही घटकांच्या दबावाखाली पालिका प्रशासन हे काम करीत नाही. याबाबत इशारा देताना जनतेच्या सुविधांसाठी आम्ही काम करतो. त्यामुळे दिघा तलावाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, असा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
महापालिका रुग्णालयांमधून तज्ञ डॉक्टर उपलब्ध करा
महापालिकेच्या रुग्णालयांमधून सर्वसामान्य नवी मुंबईकर उपचार घेत असतो. परंतु रुग्णालयांमधून तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतात. त्याचबरोबर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी गरजेच्या वेळेस यंत्रणा नसते. याबाबत लोकनेते आमदार नाईक यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. सर्वसामान्यांना उपचाराची चांगली सुविधा मिळण्यासाठी २४ तास यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी केली.
नवी मुंबई विषयी प्रेम असणारे प्रतिनियुक्ती वरील अधिकारीच पाठवा
नवी मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत प्रतिनियुक्ती वरील अधिकाऱ्यांचा भरणा जास्त आहे. ज्या अधिकाऱ्यांना या शहराचं भलं करायचं आहे. ज्यांच या शहरावर प्रेम आहे. अशाच अधिकाऱ्यांना कायम ठेवून उर्वरित अधिकाऱ्यांन परत पाठवण्याची मागणी लोकनेते आमदार नाईक यांनी केली.
… तर ऐरोली-काटई उड्डाणपुलाचे काम बंद पाडू
लोकनेते आमदार गणेश नाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. लोकनेते नाईक यांनी केलेल्या सूचनेनुसार ऐरोली काटई उड्डाणपुलावर कल्याणच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरही याबाबत कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. येत्या तीन महिन्यांमध्ये या मार्गिकांचे काम गतिमान केले नाही तर जनहितासाठी या उड्डाणपुलाचे काम बंद पाडू, असा इशारा लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी दिला.
रेल्वेसाठी चौदाशे कोटी रुपये दिल्यास आंदोलन
मुंबई कर्जत आणि पनवेल रेल्वे प्रकल्पासाठी नवी मुंबई महापालिकेकडून चौदाशे कोटी रुपये मागण्यात आले आहेत. एम एम आर डी ए सिडको आणि नवी मुंबई महापालिकेकडून निधी घेण्यात येणार आहे. हे १४०० कोटी रुपये देऊ देणार नाही. कोविडच्या संकट काळामध्ये एम एम आर डी ए आणि सिडको महामंडळ या दोन्ही प्राधिकरणांनी नवी मुंबईला एक रुपयांची ही मदत केली नाही. त्यामुळे नवी मुंबईची लूट होऊ देणार नाही. जर हा निधी देण्याचा प्रयत्न झाला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करून त्याला विरोध करू असा इशारा लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिला.
चौकट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गात नौसेना दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौसेनेच्या झेंड्यावर केंद्र सरकारने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार मुद्रित करण्यात आली आहे. आता नवसैनिकांच्या गणवेशावर देखील ही राजमुद्रा विराजमान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना लोकनेते आमदार नाईक यांनी भाजपा सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांवर काम करीत असल्याचे प्रतिपादन केले. महाराजांची राजमुद्रा नौसेनेच्या झेंड्यावर आणि नौसैनिकांच्या गणवेशावर मुद्रित होणे हा महाराष्ट्रासाठी मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.