स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : वाशीमध्ये असलेल्या आरक्षित भुखंडावर महाराष्ट्र भवनचे काम तातडीने करणेबाबत सिडको प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये वाशी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावरच महाराष्ट्र भवनसाठी भुखंड राखीव आहे. वाशी रेल्वे स्टेशन परिसरात आपण फेरफटका मारल्यास आपणास विविध राज्यातील भवन दिमाखात उभी असलेली पहावयास मिळतील. पण महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्र भवन आजतागायत उभे राहू शकले नाही, ही नवी मुंबईकर जनतेसाठी खरोखरीच शोकांतिका आहे. महाराष्ट्र भवनचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी विविध संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सिडको तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. आंदोलनेही केलेली आहे. परंतु महाराष्ट्र भवन उभारण्याचे गांभीर्य सिडकोच्या आजतागायत लक्षात आलेले नसल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सिडकोने नवी मुंबई शहर वसविताना अब्जावधी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे व आजही मिळवत आहे. सिडकोने नैतिकता दाखवत यापूर्वीच महाराष्ट्र भवनची उभारणी करणे आवश्यक होते. नवी मुंबईत इतर राज्याची भवन दिमाखात उभी असताना महाराष्ट्र भवनसाठी असलेला रिकामा भुखंड हे सिडकोच्या अकार्यक्षमतेचे व उदासिनतेचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवत आहे. महाराष्ट्र भवनच्या कामाला सिडकोने लवकरात लवकर सुरुवात करावी आणि हे काम गतीमान करत महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नामदेव भगत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.