नवी मुंबई : ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील उलवे नोडमधील २० हून अधिक अनधिकृतरित्या चालणारे अवैधरित्या चालणारे दारू विक्रीचे धंदे तातडीने बंद करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव व रायगड, नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सध्या ख्रिसमस व नववर्ष जवळ येत चालले आहे. या सुमारास नवी मुंबई, पनवेल, ठाणे, उरण व अन्य शहरी भागात दारूच्या पार्ट्यांना उधाण येते. अपघात होतात. अनेक मुले अनाथ होतात, अनेक महिला विधवा होतात. संसार धुळीला मिळतात. हे चित्र थांबविण्यासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय भुभागाने विस्तिर्ण आहे. त्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे, याची आम्हाला जाणिव आहे. अशा परिस्थितीतही आपण करत असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील उलवे नोडमध्ये मोकळ्या भुखंडावर गेल्या काही वर्षांपासून अवैधरित्या अनधिकृतपणे दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. या गोष्टी विनापरवाना खुलेआमपणे उलवे नोडमध्ये सुरू आहेत. उलवे नोडमध्ये जवळपास २० हून अधिक ठिकाणच्या मोकळ्या भुखंडावर अशा प्रकारची दारू विक्री होत आहे. या ठिकाणी दारू पिवून सुसाट वाहने चालविल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
एमआयएमकडून दारू बंदी, व्यसनांना प्रतिबंध यासाठी व्यापक प्रमाणावर अभियान राबविले जात आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी व प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलिल यांचेही आम्हा सर्वांना दारू बंदी व व्यसनमुक्ती अभियान कडेकोटपणे राबविण्याचे निर्देश आहेत. उलवा नोडमध्ये मोकळ्या भुखंडावर अनधिकृतरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे. महिला त्रस्त झाल्या आहेत. रस्त्यावर भांडणाचे प्रकार वाढले आहेत. हे चित्र उलवे नोडसाठी व नवी मुंबई पोलिस आयुक्तालयासाठी भुषणावह नसून आपण याविरोधात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. आपण संबंधितांना उलवे नोडमधील मोकळ्या भुखंडावर व्यापक प्रमाणावर खुलेआमपणे होत असलेले विनापरवाना दारू विक्रीचे अड्डे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून उद्धवस्त करून उलवावासियांना दिलासा देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.