अनंतकुमार गवई
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सीवूडस नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेने जोरदार आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली दोन महिन्यांची मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली तरी मुजोर मॉल प्रशासनाने आणि मॉल मधील आंतरराष्ट्रीय ब्रँड च्या काही दुकानदारांनी अद्याप पाट्या मराठीत केल्या नाहीत. याविरुद्ध ‘दुकानांवरील पाट्या मराठीत झाल्याच पाहिजेत’, ‘मराठीचा मान राखलाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा देवून मनसे कार्यकर्त्यांनी मॉल परिसर दणाणून सोडला. तसेच मॉल प्रशासना विरुद्ध आक्रमक पवित्रा घेत मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
“दुकानांवरील इंग्रजी पाट्या जोपर्यंत खाली उतरवत नाहीत तोपर्यंत मॉल मधून एकही मनसे कार्यकर्ता बाहेर जाणार नाही” असा आक्रमक पवित्रा मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी घेतला. तसेच ‘येत्या काही दिवसात मॉलमधील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या नाहीत तर मनसेच्या झेंड्याला दांडा सुद्धा आहे हे मॉल प्रशासनाने लक्षात ठेवावे” असा सज्जड इशारा मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी दिला. मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून मॉल प्रशासनाने इंग्रजी पाट्या तात्काळ हटवायला सुरुवात केली. तसेच येत्या सात दिवसात मॉल मधील दुकानांवरील सर्व पाट्या मराठीत करू असे आश्वासन मॉल चे महाव्यवस्थापक अविनाश दुबे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले. मनसेच्या या आंदोलनात उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष निलेश जाधव, अमोल आयवळे, उमेश गायकवाड, अक्षय भोसले, उप विभागअध्यक्ष नरहरी कुंभार, राजेंद्र खाडे, विनोद लांडगे, शाखा अध्यक्ष प्रमोद डेरे, संदीप कांबळे, आतिष पाटील, प्रणित डोंगरे, रोहित शिवतरे, गणेश पाटील, मयूर कारंडे, जनहित कक्ष शहर सचिव मंगेश काळेबाग व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक हजर होते.