स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
कणकवली : भाजपची तोफ समजले जाणारे युवा आमदार नितेश राणे दररोज मविआची विशेषत: उबाठाची त्यातल्या त्यात प्रामुख्याने खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची चिरफाड मुद्देसुद करताना व भाजपची प्रभावीपणे बाजू मांडताना पहावयास मिळतात. पण या राजकिय धडाडीमागे एक जनहितैषी समाजसेवी चेहराही लपलेला आहे व तो सातत्याने जनसामान्यांच्या मदतीला धावून जातो हे आमदार नितेश राणे वारंवार आपल्या कृतीतूनही दाखवून देत असतात. रविवारी दुपारी त्याचा पुन्हा एकवार प्रत्यय वैभववाडी तळेरे मार्गावरील एका अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला मदत करताना पहावायस मिळाला.
वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून भाजपाचे आमदार नितेश राणेंनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ रुग्णवाहिका मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नाधवडे येथील बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहून आमदार नितेश राणे रविवारी सायंकाळी ४ वाजता कणकवलीच्या दिशेने येत होते.
नाधवडे दूध डेअरीच्या नजीक आमादर नितेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा आला असताना त्यांना रस्त्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण दिसला. त्याच्या मोटारसायकलला ठोकून अज्ञात वाहनाने पलायन केले होते. अपघातग्रस्त तरुणाला पाहताच आमदार नितेश राणेंनी तात्काळ आपली गाडी थांबवून त्या तरुणाची विचारपूस केली. तात्काळ रुग्णवाहिका मागवून त्या जखमी तरुणाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.