रामाचा आश्रय घेऊन भाजपला सत्तेचे सोपान चढायचे आहे हे लपून राहिले नाही. गेल्या १० वर्षात सांगण्यासारखे काही नाही लोकांच्या श्रद्धा कुरवाळून प्रसंगी त्या उत्तेजित, हिंसक करीत त्यांना सत्ता काबीज करायची आहे. कदाचित हे केवळ प्राणप्रतिष्ठा करूनही होऊ शकले असते, परंतु लोक भावना चेतवून, देशात उन्मादी अवस्था निर्माण केल्याशिवाय संख्या पूर्ण होणार नाही. त्यासाठी देशभर धार्मिक उन्माद निर्माण करण्यात संघ परिवार यशस्वी झाला आहे.
अशा नेमक्या काळात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’ हा नारा देऊन या धार्मिक उन्मादाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या तीन ते चार कोटी मराठा तरुणांना अलगद बाजूला करण्याची मोठी आणि ऐतिहासिक किमया साधली आहे त्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी, विवेकी वर्गाने मनोज जरांगे पाटील यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. कल्पना करा चलो मुंबई हा नारा नसता तर मराठवाडा आणि राज्यातील कोट्यवधी मराठा तरुण मेंदू बाजूला काढून या धार्मिक उन्मादाचा भाग बनले असते.
अयोध्येचा सोहळा एका महिन्यावर असताना त्यांच्या फार आधी देशभरात त्याचे नियोजन आणि वातावरण निर्मितीचे हजारो इव्हेंट विविध क्षेत्रात सुरू करण्यात आले, त्याचवेळी देशातील नंबर दोनवर असणाऱ्या आपल्या राज्यात मराठा आरक्षण आंदोलन एका उंचीवर जरांगे पाटलांनी नेऊन ठेवले होते. त्यामुळे संघ,भाजपच्या जाळ्यात हव्या त्या प्रमाणात मराठा तरुण अडकू शकला नाही, मराठवाड्यात तर सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही उपक्रमाची मराठ्यांना प्रचंड चीड निर्माण झाली आहे, त्याच्या तळाशी मराठा आरक्षण हा मुद्दा आहे.
मराठा कोणतेही कार्य अंगावर घेतो, तेव्हा परिणामांची त्याला पर्वा नसते. जे होईल ते बघून घेऊ या जिद्दीने तो कामाला भिडतो, जरांगे पाटलांच्या आंदोलनात हा समाज छातीचा कोट करीत आणि सर्वोच्च त्याग, समर्पण या तयारीनिशी भिडला आहे. ‘चलो मुंबई’ घोषणा त्यांनी ऐन प्राणप्रतिष्ठा काळात करू नये, याचे कमी प्रयत्न झाले नाही. पण जरांगे पाटील पता नही किस मिट्टी का बना हुवा है त्याने ऐकले नाही. हाती घेतलेल्या ध्येयापासून तसूभरही न ढळता या माणसाने मुंबई चलो हाक दिली, त्याला मिळणारा अति भयंकर प्रतिसाद पाहता भाजप, संघवाले बिथरले आहेत.
धर्माच्या नावावर हवा तसा वापर करता येणारा कोट्यवधी मराठा तरुण त्यांच्या हातातून निसटला आहे आणि त्यासाठी जरांगे पाटील मोठा अडथळा ठरले आहेत हे लक्षात घ्या. २० तारखेला हा धार्मिक उन्माद टिपेला असताना जरांगे पाटील अंतरावली सराटी येथून बाहेर पडले आणि इतिहास घडला हा मराठा मार्च गेवराईला पोहोचला तेव्हा त्याचे दुसरे टोक अंतरावली गावातच होते यावरून किती जनसमुदाय सोबत होता हे लक्षात येते. सुरुवातीला किमान ५ लाख स्त्री, पुरुष, तरुण या मार्चमध्ये सामील झाले होते. दरेक दिवशी आता त्यात आणखी लाखो लोक सहभागी झाले होते. ही मराठा त्सुनामी जरांगे पाटलांनी धार्मिक उन्मादात जाण्यापासून रोखून एका विधायक कामात लावली ,त्याचाही विक्रम झाला. उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा इतिहास लिहिला जाईल त्याचवेळी जरांगे पाटलांच्या या सोनेरी पानाचाही त्यात समावेश असेल. जरांगे पाटील धन्यवाद ,मराठा मन, मेंदू अन मनगट तुम्ही सुरक्षित ठेवले आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद – ९८९२१६२२४८