मुंबईतील २०० शाळांमधील शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात ‘थर’ चित्रपटाच्या टीमने साधला संवाद :
वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनिल बोरनारे यांना मुंबईतील शिक्षकांनी शिक्षक आमदार म्हणून निवडून द्यावं असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पदवीधर संयोजक धनराज विसपुते यांनी केले. दादरमधील छबिलदास शाळेच्या सभागृहात मुंबई मराठी अध्यापक संघ जुनी पेन्शन शिक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्याला ते बोलत होते.
यावेळी संतोष भणगे – सदस्य – सुकाणू समिती महाराष्ट्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सदानंद रावराणे – जनरल सेक्रेटरी – महामुंबई शिक्षण संस्था संघटना, विनय राऊत सहसचिव – महामुंबई शिक्षण संस्था संघटना, संजय पाटील अध्यक्ष – बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना, वीणा दोनवलकर सरचिटणीस बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना, नकुल लवू रेडकर कोषाध्यक्ष – बृहन्मुंबई माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघ, विलास चव्हाण शिक्षक – अभिनेता-निर्माता थर चित्रपट हे उपस्थित होते.
मुंबईतील २०० शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षकेतर म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. २००५ आधी व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विना अनुदानित शाळांना पुढील अनुदानाचा टप्पा जाहीर करावा, कॅशलेस मेडिक्लेम योजना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट देण्यात यावी, मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करावे यासह अनेक ठराव या मेळाव्यात मांडण्यात येऊन मंजूर करण्यात आले या विषयावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
थर चित्रपटाचे निर्माते अभिनेते विलास चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. थर हा चित्रपट दहीहंडी उत्सवावर भाष्य करणारा असून लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपट पाहण्याचे आव्हाहन सर्व उपस्थिताना केले. यावेळी लेखक दिग्दर्शक अमित मोहिते आणि जेष्ठ अभिनेते शिवाजी पाटाणे उपस्थित होते. शिक्षक मेळाव्याला ८०० शिक्षकांची उपस्थिती होती.