सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ मध्ये देशात व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त केल्यानंतर ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सामोरे जाताना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे आपले ध्येय कायम असल्याचे सांगत ‘संकल्प स्वच्छतेचा’ मांडला आहे.
या अनुषंगाने नव्या उत्साहाने लोकसहभागावर भर देत महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्र कामाला लागले असून सर्व आठही विभागांमध्ये विविध स्वच्छता उपक्रम राबविले जात आहेत. नुकताच नवी मुंबईचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘बेलापूर किल्ल्याची विशेष स्वच्छता मोहीम’ हाती घेण्यात आली.
यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सक्रिय सहभागी होत उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व स्वकृतीतून पटवून दिले. बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी सतिश सनदी तसेच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक आणि बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीवृंदाने बेलापूर किल्ल्याच्या विशेष स्वच्छता मोहिमेत हिरीरिने सहभाग घेतला.
या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठया संख्येने विदयार्थी व युवक सहभागी झाले होते. ऐतिहासिक किल्ल्याची सफाई केली जात असल्याने एक वेगळया प्रकारची प्रेरणा या मोहिमेतून लाभल्याचे अनेक विदयार्थी युवकांनी सांगितले. यामध्ये नेरुळ येथील एसआयईएस महाविदयालयाचे एनएसएसचे विदयार्थी तसेच इंदिरा गांधी महाविदयालय, घणसोली येथील एनएसएसचे विदयार्थी, त्याचप्रमाणे शिवमावळा संस्थेचे उत्साही सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी किल्ल्याची स्वच्छता करण्याप्रमाणेच शिवमावळा समुहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, बेलापूर किल्ल्याचे महत्व् तसेच गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेची गरज मांडण्यात आली. बेलापूर किल्ल्याची ही स्वच्छता मोहीम म्हणजे प्रेरणादायी इतिहासाला केलेले अभिवादन आहे अशी भावना स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या शंभरहून अधिक अधिकारी, कर्मचारी, युवक, विदयार्थी व नागरिकांची होती.