नवी मुंबई : मुंबई – गोवा महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग असे नाव तातडीने देण्याची मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सर्वप्रथम राज्य सरकारने मुंबई – गोवा महामार्गाचे तातडीने काम पूर्ण करावे, ही आम्हा कोकणवासियांच्या वतीने हात जोडून कळकळीची विनंती करत आहोत. गोवा-मुंबई महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडल्याने तसेच संथ गतीने सुरु असल्याने आम्हा कोकणवासियांचे आजवर अतोनात हाल झाले आहेत. महाराष्ट्रात समृद्धीसह अनेक मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे रूंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे. मग मुंबई-गोवा महामार्गाला इतका विलंब का होत आहे? कोकणवासियांना गणेशोत्सव व होळीसाठी गावी जाताना खुप त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे सेवा असली तरी कोकणवासियांसाठी ती पुरेशी नाही. त्यामुळे आजही कोकणवासियांना वाहने घेवूनच परिवारासह गावाला याच मार्गावरून ये-जा करावी लागत अहो. सरकारने कोकणवासियांच्या संयम व सहनशीलतेचा अंत पाहू नये व लवकरात लवकर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत. तसेच कोकणच्या भूमीशी व छत्रपती शिवाजी महाराजांचे एक आगळेवेगळे नाते आहे. शिवछत्रपतींच्या स्पर्शांने ही कोकणची भूमी पावन झालेली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे व राज्य सरकारने तसा निर्णय लवकरात लवकर जाहिर करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.