नवी मुंबई : कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या माध्यमातून नेरूळ सेक्टर दोन येथील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
नेरूळ येथून कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या समवेत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर, बाळा गावडे , वामन रंगारी आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी युनियनचे सदस्य व स्थानिक रहीवाशी वाशी सेक्टर १७ मधील शिवाजी चौकात शिवछत्रपतींच्या स्मारकाजवळ गेले. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करून ढोलाताशांच्या गजरात शिवज्योत वाशी सेक्टर १७ ते नेरूळ सेक्टर २ येथील कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात पामबीच मार्गे पायी आणण्यात आली. कामगार नेते रविंद्र सावंत, कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर व कॉंग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पायी चालत शिवज्योत वाशीहून नेरूळ येथे आणली. नेरूळ येथे शिवप्रतिमेचे पूजन करून शिवछत्रपतींच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आला. कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या शिवाजी महाराज की जय या घोषणांनी वातावरण शिवमय झाले. यावेळी रविंद्र सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जीवनामध्ये शिवचरित्रानुसार वर्तन करण्याचे आवाहन केले.
शिवजयंतीनिमित्ताने विभागातील लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि डोळ्यांचे शिबिर ,अल्पदरात चष्मा वाटप अशा समाजोपयोगी उपक्रमाचेही कामगार नेते रविंद्र सावंत यांनी आयोजन केले होते.