स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाचा मंगळवारी जो अर्थसंकल्प सादर झाला, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसल्याने भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी महापालिका अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
नवी मुंबईकरांवर करवाढीचा कोणताही बोजा न लादण्याची आजवर आमची भूमिका राहिली आहे. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीमध्ये देखील यासाठी आम्ही आग्रही राहिलो आहोत. त्यानुसार कोणतीही करवाढ नसलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे स्वागतच आहे. मात्र त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, पर्यावरण, दळणवळण, सार्वजनिक स्वच्छता, लोककल्याणकारी योजना यासाठी अर्थसंकल्पात राखीव निधीचा काटेकोरपणे वापर व्हायला पाहिजे. अर्थसंकल्पातील संकल्प प्रत्यक्षात साकारताना आर्थिक शिस्त महत्त्वाची असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी म्हटले आहे.
महापालिका अर्थसंकल्पावर संदीप नाईक यांचा दांडगा अभ्यास आहे. २००५ ते २०१० या महापालिकेच्या तिसऱ्या सभागृहात नगरसेवक म्हणून वावरताना सलग पाच वर्षे संदीप नाईक यांनी स्थायी समितीवर काम केले आहे. पहिली दोन वर्षे सदस्य म्हणून तर उर्वरित तीन वर्षे स्थायी समिती सभापती म्हणून संदीप नाईक कार्यरत होते. सभापती म्हणून त्यांनी महापालिकेच्या वातानुकूलित कार्यालयात बसून कारभार करण्यात स्वारस्य न मानता ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबविताना संदीप नाईकांनी नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात पायपीट केलेली आहे. नागरी समस्या निवारणासाठी व नागरी सुविधा निवारणासाठी लागणाऱ्या निधीची त्यांनी त्या त्या भागात जावून पाहणी केली होती. लोकांशी सुसंवाद साधला होता. त्यामुळे अर्थसंकल्पात कोणत्या विषयावर , कोणत्या कामावर किती निधी लागेल याबाबत संदीप नाईकांचा अभ्यास दांडगा आहे.