नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या अर्धकुशल कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळून त्यांची गणना कुशल कामगारांमध्ये व्हावी व त्यांची वेतनवाढ व्हावी यासाठी महापालिका प्रशासन व मंत्रालयदरबारी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या इंटक कर्मचारी संघटनेच्या व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शहर अभियंता विभागातील अर्धकुशल अशा स्वरूपातील ११६७ कर्मचाऱ्यांना कुशल कामगार म्हणून प्रमोशन व वेतनवाढ मिळाली असल्याची माहिती इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे कंत्राटी विभागाचे अध्यक्ष संजय सुतार यांनी दिली.
अर्धकुशल कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे पालिका प्रशासनात काम केल्याने त्यांना कुशल कर्मचारी म्हणून प्रमोशन मिळावे आणि त्यांची वेतनवाढ व्हावी यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी इंटक, महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पालिका आयुक्तांकडे वेळोवेळी शिष्टमंडळ नेवून कर्मचाऱ्यांसमवेत चर्चा केली. अर्धकुशल कर्मचाऱ्यांची समस्या पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मंत्रालयातही सातत्याने लेखी पाठपुरावा करताना संबंधितांना शिष्टमंडळासमवेत रविंद्र सावंत यांनी भेटी घेतल्या. इंटक, महाराष्ट्र कर्मचारी युनियन व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्याची पालिका प्रशासनाने दखल घेत ११६७ कर्मचाऱ्यांना कुशल कर्मचारी म्हणून प्रमोशन दिले आहे. या प्रमोशनमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातही फरक पडला असून आता या कर्मचाऱ्यांना २८ हजार ७२४ रुपये मासिक वेतन मिळणार असल्याची माहिती संजय सुतार यांनी दिली.