स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : रायगडमधील महाड येथील ऐतिहासिक सार्वजनिक चवदार तळ्याची स्वच्छता व तेथील परिसराचे तातडीने सुशोभीकरण करण्याची लेखी मागणी एमआयएमचे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नवी मुंबईचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्यासाठी २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळे आंदोलन केले होते. त्यामुळे या तळ्याची इतिहासातही नोंद आहे. परंतु या प्रसिद्ध तळ्याची अवस्था आज दयनीय आहे. तळ्याची देखभाल राखली जात नसल्याने बकालपणा आला आहे. २० मार्च रोजी आंदोलनाची आठवण म्हणून या ठिकाणी आंबेडकरी समाज व इतर समाजातील नागरिक तळ्यावर मोठ्या ठिकाणी येत असतात. अजून २५ दिवसाचा कालावधी बाकी आहे. आपण संबंधितांना चवदार तळ्यातील पाण्याची स्वच्छता व साफसफाई करण्याचे तातडीने आदेश द्यावेत तसेच या तळ्याभोवती असणाऱ्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अस्पृश्यांसाठी लढा उभारला होता. त्या लढ्याचे स्थळ असणाऱ्या तलावाला असलेला बकालपणा या राज्याला भुषणावह नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य ओळखून सरकारने चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ करण्याचे व साफसफाई करण्याचे तसेच चवदार तळ्याभोवती असणाऱ्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.