स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका हद्दीत लागणाऱ्या अनधिकृत होर्डीगवर कारवाई करण्याचे व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अतिक्रमण विभागाला आदेश देण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये पालिका हद्दीत ठिकठिकाणी प्रभागाप्रभागात मोठ्या प्रमाणावर तसेच पथदिव्यावरही अनधिकृत होर्डींग लागत आहेत. इतकेच नाही तर बसथांब्यावरील लोखंडी कमानी वर तसेच आता नव्याने केलेल्या बसथांब्यातील अंर्तगत भागातही बॅनर, होर्डीग लावले जात आहे. पालिका उद्यानात अथवा सार्वजनिक ठिकाणीही बॅनर व होर्डींगने जागा व्यापलेली दिसून येत आहे. अनधिकृत होर्डींगमुळे परिसराला बकालपणा येत आहे व महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत. तथापि महापालिकेचा अतिक्रमण विभाग अनधिकृत फलक, बॅनर व होर्डीग विरोधात कारवाई करत नसल्याने अनेक दिवस, महिने काही ठिकाणी वर्षभरही बॅनर, होर्डीग, फलक पहावयास मिळत आहे. मुख्य रस्त्यावरील बॅनर हटविले जात असले तरी अंर्तगत भागातील बॅनरला अभय मिळत आहे. या अनधिकृत बॅनरमुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असतानाही अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. आपण महापालिका हद्दी मुख्य भागात तसेच अंर्तगत भागात लावल्या जाणाऱ्या अनधिकृत बॅनरवर दररोज कारवाई करण्याचे व अनधिकृत बॅनर, होर्डींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.