स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचे ठिकठिकाणी आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या यात्रेचा एक महत्वकांशी हेतू आहे की, केंद्र सरकारच्या योजना या महिला व मुली, मागासवर्गीय युवक व युवती, प्रकल्पग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बलघटकांपर्यंत पोहचवल्या जाव्यात. या अनुषंगाने आज बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर ‘अ’ विभागातील दिवाळे गाव परिसरात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आयुष्मान भव: अभियानद्वारे विविध प्रकारच्या तपासण्या देखील करण्यात आल्या. तसेच आयुष्मान भारत कार्ड, उज्वला योजना, मुद्रा कर्ज योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक विविध प्रकारच्या केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला. तसेच सरकार राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घेता यावा याकरिता लाभार्थ्यांनी सरकारी कार्यालयात येण्याऐवजी सरकारनेच लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली जात आहे. तसेच सदर योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा व सर्व संबंधित विभागांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने शहरी भागासाठी १५ विविध प्रकारच्या योजना आखून दिल्या असून त्याविषयीची माहिती वाहनावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवरुन कार्यक्रम स्थळी प्रसारित केली जात आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य शासन तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या लोककल्याणकारी विविध योजना व उपक्रम यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले असून तेथे योजनांशी संबधित अधिकारी, कर्मचारी योजनांविषयीची माहिती देतील तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज दाखल करण्यास संपूर्ण सहकार्य करतील. त्यामुळे या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचतील व पात्र नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच सरकारच्या योजना या मोबाईल मधील अॅपवर असून अॅपवर माहिती भरुन योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सहजशक्य आहे. तथापि नागरिकांकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये अॅपदेखील आहे, मात्र ते वापरण्याचे ज्ञान नाही, ही परिस्थिती बदलण्याची गरज व्यक्त करीत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्यासाठी व जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने अधिक प्रभावीपणे प्रयत्न केला जाईल असे सांगितले. याकामी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे यांचीही मदत घेतली जाईल असे ते म्हणाले. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत सर्व उपस्थितांनी ‘आपला संकल्प – विकसित भारत’ ही सामुहिक शपथ ग्रहण केली.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका राजश्री कातकरी, प्रभाग समिती सदस्य बाळकृष्ण बंदरे, ज्येष्ठ समाजसेवक जी.एल.करणानी, खांदेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष रमेश हिंडे, समाजसेवक सुधीर पाटील, एकविरा रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, छाया कला सर्कल सदस्य घनश्याम कोळी सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल, विकसित भारत नोडल अधिकारी फिरोज तड्वे तसेच असंख्य भाजप कार्यकर्ते व पालिका अधिकारी उपस्थित होते.