स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नमो चषक २०२४ अंतर्गत १५०, ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित वुमन्स वॉकेथॉनला आज उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऐरोलीमधील हजारो महिलांनी वॉकेथॉनमध्ये उत्साही सहभाग नोंदवून निरोगी आयुष्यासाठी खेळ खेळण्याचा संदेश दिला.
नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी हिरवा कंदील दाखवून वॉकेथॉनचा शुभारंभ केला तर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडा स्पर्धेची जल्लोषात सांगता झाली. भारतीय जनता पक्षाचे ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सेक्टर १४ शिव राधा कृष्ण मंदिर येथून वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. पारंपारिक वेशभूषेतही महिला सहभागी झाल्या होत्या. लेक व्ह्यू सोसायटी सेक्टर १४, गणपती मंदिर सेक्टर १५, अभ्युदय बँक वेलकम स्वीट समोर अशाप्रकारे विविध भागात फिरून अडीच किलोमीटरची ही स्पर्धा सेक्टर १५ येथील चौकामध्ये संपन्न झाली. विजेत्या स्पर्धकाला सोन्याची नथ भेट देण्यात आली. अकरा पैठण्यांची सोडत खास आकर्षण होते. सहभागी सर्व महिलांना विशेष भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नवी मुंबईमध्ये नमो चषकाचे आयोजन विविध नोडमध्ये, विविध खेळ प्रकारांमध्ये आणि विविध वयोगटातल्या श्रेणीमध्ये करण्यात आल्याची माहिती यावेळी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १ लाखांहून अधिक नागरिकांनी नमो चषकामध्ये नोंदणी केली. ज्येष्ठ नागरिक, तरुणांकरिता, महिलांकरिता, विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा होत्या. क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, चित्रकला अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करत असताना वुमेन्स वॉकथॉन या स्पर्धेचे आयोजन अशोक पाटील, संगीता पाटील ऐरोली येथील भाजपा कोअर टीम यांनी यशस्वीरीत्या केलं. महिलांकरिता आयोजित नवी मुंबईतील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांचा खेळत सहभाग वाढावा, फिटनेस टिकवावा, हा उद्देश यामागे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं नमो चषक देशभरात आयोजित केला जातो आहे. नवी मुंबईत त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलाभिमुख योजना महिलांना उपयुक्त ठरताहेत. घराचं उत्तम बजेट हे महिलाच उत्तमरित्या बनवू शकते. म्हणूनच देशाचं बजेट बनवण्याची आणि त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही एका महिलेवर सोपवण्यात आली आहे. वुमेन वॉकथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला. हा फिटनेस वर्षभर टिकला पाहिजे. त्यासाठी नवी मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नांमुळे चांगलं आहे. मीही माझ्या आमदारकीच्या कालखंडात यासाठी प्रयत्नशील होतो. यासाठी अशोक पाटील यांनी घेतलेला पुढाकार आणि केलेलं काम उल्लेखनीय आहे. सगळ्यात पहिला आमदारनिधी ऐरोलीतील पर्यावरण पूरक जॉगिंग ट्रॅककरिता देण्याची मागणीही अशोक पाटील यांनीच केली होती. आज त्या ट्रॅकला १० वर्षे झाली. तो सुस्थितीत आहे. यामागे अशोक पाटील आणि संगीता पाटील या जागरूक प्रतिनिधीचे श्रेय आहे.
आमचे ज्येष्ठ सहकारी अशोक पाटील आणि संगीता पाटील या दोघांनीही लोकप्रतिनिधी म्हणून खूप चांगले काम केलेलं आहे, या शब्दात डॉक्टर संजीव नाईक यांनी या दोघांचे कौतुक केले. महापालिकेतील लोकप्रतिनिधी सभागृह नाही पण सामाजिक कार्य सुरूच आहे. नमो चषक जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महिलांकरिता उत्कृष्ट असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिला सुदृढ, सक्षम राहिल्या पाहिजेत, त्यांचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, ही भावना प्रगतीच्या आणि प्रचाराच्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेतला. शेकडोंच्या संख्येने महिला आल्या आहेत. दोन-तीन तासांचा वेळ त्यांनी इथे आनंदात घालवला. लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा नेहमीच प्रयत्न असतो, महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या अनुषंगाने जे करणं आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, याचा आनंद असल्याचे डॉ. संजीव नाईक यांनी यावेळी सांगितले.
वॉकेथॉनमध्ये अडीच किलोमीटरचे अंतर माझ्या सर्व माताभगिनी स्पर्धकांनी आनंदाने सहभाग घेऊन पार केले. नवी मुंबईत वॉकेथॉन ठेवण्याचे एकच उद्दिष्ट होते की, या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाद्वारे महिलांचे आरोग्य चांगले राहावे, अशी माहिती माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी दिली. महिला आपल्या कुटुंबाच्या कामात व्यस्त असतात. त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या निमित्ताने जनजागृती होते आहे. असेच उपक्रम लोकनेते आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली घेत राहू, असेही ते म्हणाले.