नवी मुंबई : जुईनगरमधील सेक्टर २४ येथे महापालिकेने बनविलेले प्राणी रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्याची व त्या रुग्णालयास पालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी कै. डॉ. वैभव झुंजारे यांचे नाव देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
जुईनगर सेक्टर २४ मध्ये महापालिका प्रशासनाने प्राणी रुग्णालयाचे बांधकाम केलेले आहे. इमारत सुसज्ज आहे, बांधून तयार आहे. महापालिकेचे हे पहिले प्राणी रुग्णालय आहे. पशूप्रेमी व प्राणीप्रेमी हे प्राणी रुग्णालय सुरू होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. हे रुग्णालय कार्यान्वित झाल्यास पाळीव तसेच सोसायटीतील प्राण्यांवर, पक्ष्यांवर उपचार करवून घेणे नवी मुंबईकरांना सोयिस्कर होईल. सीवूडस येथील एनआरआय वसाहतीच्या मागील बाजूस फ्लेमिंगो पक्षी मृत अवस्थेत आढळले होते. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी भटकी व मोकाट कुत्री, मांजरी, गाया जखमी अवस्थेत पहावयास मिळतात. हे रुग्णालय सुरू झाल्यास या जखमी प्राण्यांवर उपचार करवून घेणे शक्य होईल. सर्वसामान्यांना खासगी डॉक्टरांकडे पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी खिशाला झळ सोसावी लागते. हे महागडे दर आकारात उपचार करत असतात. तुलनेने महापालिका प्राणी रुग्णालयात स्वस्त दरात उपचार उपलब्ध होतील. महापालिकेने बनविलेले प्राणी रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करून नवी मुंबईकरांना आपण दिलासा द्यावा. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते. या प्राणी रुग्णालयास डॉ. वैभव झुंजारे यांचे नाव देण्यात यावे. रुग्णालयाचे लोकार्पण व्हावे आणि या रुग्णालयास डॉ. वैभव झुंजारे यांचे नाव देण्यासाठी आम्ही आपणाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. आपण आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.