राजेंद्र पाटील : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : जिल्हा नियोजन समिती योजनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेला शासनाने यावर्षी २६ कोटीचा निधी दिला असून पुढील वर्षीसाठी ३६ कोटीचा निधी देण्यात येणार आहे. तसेच १७०० कोटी खर्चुन देशातील सर्वात मोठे ट्रेनिंग सेंटर एमआयडीसीच्या माध्यमातून कळंबोलीमध्ये उभारले जाणार आहे. अशा विविध माध्यमातून पनवेल परिसराचा विकास शासन करत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या भूमीपूजनाबरोबर विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ १४ फेब्रुवारी रोजी कळंबोली मधील सेक्टर ११ येथील प्लॉट क्रमांक ६/१ येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे , खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश बालदी, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, आमदार रमेश शेंडगे, आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी, कळंबोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, पनवेलमध्ये या विविध विकास कामांच्या भूमीपूजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पनवेलच्या विकासाची सुरूवात झाली आहे. पनवेल परिसरातील प्रलंबित प्रश्न शासन सोडविते आहे. येत्या काळात पनवेल महापालिका विकासात्मक दृष्ट्या सदृढ होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, सबका साथ सबका विकास हे सूत्र पनवेल महानगरपालिकेने स्वीकारले असून महापालिका ग्रामीण भाग व शहरी भाग दोन्ही भागामध्ये विकासकामे करताना दिसत आहे. त्याचीच परिणीती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाची उभारणी आहे. याच बरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे कामही या विकास कामांमध्ये होत असून महापालिका आता वेगाने धावते असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, नवीन महापालिका असताना मनुष्यबळ कमी असते, यंत्रणा कमी असते असे असून देखील पनवेल महानगरपालिका वेगाने काम करत आहे.आंतरराष्ट्रीय विमातळ होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका आपले अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न् करते आहे.
आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, पालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मनपाने कामे करण्यास सुरवात केली आहे. राज्य शासनाच्या पाठिब्यांमुळे जीएसटीचे अनुदान पालिकेस सुरू झाले असून अमृत २ अंतर्गत मिळालेल्या भरीव निधीच्या माध्यमातून महापालिकने एसटीपी प्लॅन्टची कामे सूरू केली असून येत्या काळात शंभर टक्के ड्रनेजची कामे झालेली पनवेल महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या समारंभात ६५० कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूज करण्यात आले.यामध्ये सुमारे ८ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.याचबरोबर’ खारघर नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण’, ‘कळंबोली नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण’, ‘महानगरपालिका मुख्यालय लगतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण व उन्नतीकरण’, ‘पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण’ या २३३ कोटी रूपयांच्या कामाचे , ‘अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या व मल प्रक्रिया केंद्र उभारणे या २५७ कोटी रूपयांचे आणि १४८ कोटी खर्चुन पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारणे’ या कामांचे डिजीटल पध्दीतीने मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून उद्घाटन करण्यात आले.