स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com -८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील एलआयजीसमोरील मल:निस्सारण केंद्राच्या जागेवर मंजुर झालेल्या क्रिडासंकुलाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करण्याची लेखी मागणी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
सर्वप्रथम नेरूळ सेक्टर २ येथील महापालिकेच्या मल:निस्सारण केंद्राच्या जागेवर क्रिडासंकुल उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. तसेच नवीन सुधारीत विकास आराखड्यामध्ये मल:निस्सारण केंद्राच्या जागी क्रिडासंकुलाची तरतूद केलेली आहे. यासाठी सर्वप्रथम आपले महापालिका प्रशासनाचे आभार असे विद्या भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुळातच या मल:निस्सारण केंद्राची निर्मितीच सिडकोकालीन चुकीच्या ठिकाणी झालेली होती. एलआयजीसारख्या निवासी परिसरात आणि शिरवणे विद्यालयासारख्या शैक्षणिक संकुलाच्या लगत हे मल:निस्सारण केंद्र आहे. या केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीचा व डासांचा नेरूळ सेक्टर दोन, चार, जुईनगर मधील तसेच समोरील एलआयजीमधील रहीवाशांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी गेली अनेक वर्षे त्रास सहन केलेला आहे. कॉंग्रेसचे नेते रविंद्र सावंत यांनी २००९-१० पासून महापालिका प्रशासनाने मल:निस्सारण केंद्राच्या जागेवर क्रिडा संकुल उभारावे व परिसरातील सर्वसामान्यांना जलतरण तलावाच्या माध्यमातून स्विमिंगची सुविधा व अन्य खेळांचा लाभ घेता यावा यासाठी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केलेला आहे. सातत्याने पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतलेल्या आहेत. परिसरातील एलआजीमधील तसेच सभोवतालच्या सिडको वसाहतीमधील अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांना निवासी जागेतच क्रिडा सुविधा मिळाव्यात या हेतूने कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत हे गेली १५-१६ वर्षे पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत व पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, ही वस्तूस्थिती असल्याचे विद्या भांडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेचे तत्कालीन शहर अभियंता व नेरूळ सेक्टर चार येथील स्थानिक रहीवाशी मोहन डगांवकर यांची याप्रकरणी भूमिका मोलाची ठरलेली आहे. ते स्थानिक असल्याने त्यांना समस्येचे गांभिर्य माहिती होते. या मल:निस्सारण केंद्राच्या जागी क्रिडासंकुल करण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका व केलेले मार्गदर्शन स्थानिक रहीवाशी कधीही विसरु शकणार नाही. महापालिका प्रशासनाने सानपाडा पामबीच परिसरात सुमारे दशकभरापूर्वी मल:निस्सारण केंद्र कार्यान्वित करताना जुईनगर येथील मल:निस्सारण केंद्राचा कारभार तिकडे स्थंलातरीत करण्यात आला. येथील कार्यभार सानपाडा पामबीच परिसरातील मल:निस्सारण केंद्राकडे स्थंलातरीत झाला असला तरी नेरूळ सेक्टर दोन मधील मल:निस्सारण केंद्र आजही जैसे थेच स्थितीत आहे. कॉंग्रेसच्या गेल्या १२ वर्षातील पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित मल:निस्सारण केंद्राच्या जागी क्रिडा संकुलाची विकास आराखड्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याबाबतही महापालिका प्रशासनाचे आभार मानावे तितके कमीच असल्याचे विद्या भांडेकर यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात तरतूद आहे. अर्थसंकल्पातही क्रिडा संकुलातही निधीची तरतूद आहे. क्रिडासंकुल मंजुर झालेले आहे. कामास विलंब होत असल्याने लोकांना क्रिडासंकुलाच्या सुविधेस विलंब होत आहे. कॉंग्रेस गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. लवकरात लवकर क्रिडा संकुल होणे गरजेचे आहे. क्रिडा संकुलास विलंब होत असल्याने राजकीय घटकांकडून दिशाभुल करण्याचे काम सुरु झालेले आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी राजकीय घटक वल्गना करत जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरवत आहे. मल:निस्सारण केंद्राच्या जागेवर क्रिडा संकुल मंजुर झाले आहे, विकास आराखड्यात नियोजन आहे, अर्थसंकल्पात तरतूद आहे. त्यामुळे या कामाला लवकरात लवकर सुरूवात करावी व या कामाबाबत जनतेबाबत वस्तूस्थिती सादर करावी की जेणेकरून श्रेयासाठी , चर्चेत राहण्यासाठी क्रिडासंकुलाबाबत समाजात चुकीची माहिती पसरविणाऱ्या गटकांनाही यामुळे चपराक बसेल. लवकरात लवकर कामाला सुरुवात केल्यास स्थानिकांनाही क्रिडासंकुलाची सुविधा उपलब्ध होईल. समस्येचे गांभीर्य पाहता व स्थानिक जनसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याने पालिका प्रशासनाला आपण क्रिडासंकुल उभारणीबाबत निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.