शैलेश उत्तेकर याजकडून
महाड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रह आंदोलनास २० मार्च रोजी ९७ वर्ष होत असल्याने यानिमित्ताने चवदार तळे परिसरातील समस्या सोडवून सुशोभीकरण करण्याची मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी लेखी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने चवदार तळ्याच्या सत्याग्रह वर्धापनदिनासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्यासाठी २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळे आंदोलन केले होते. त्यामुळे या तळ्याची इतिहासातही नोंद आहे. परंतु या प्रसिद्ध तळ्याची अवस्था आज दयनीय आहे. तळ्याची देखभाल राखली जात नसल्याने बकालपणा आला आहे. २० मार्च रोजी आंदोलनाची आठवण म्हणून या ठिकाणी आंबेडकरी समाज व इतर समाजातील नागरिक तळ्यावर मोठ्या ठिकाणी येत असतात. अजून २५ दिवसाचा कालावधी बाकी आहे. आपण संबंधितांना चवदार तळ्यातील पाण्याची स्वच्छता व साफसफाई करण्याचे तातडीने आदेश द्यावेत तसेच या तळ्याभोवती असणाऱ्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी अस्पृश्यांसाठी लढा उभारला होता. त्या लढ्याचे स्थळ असणाऱ्या तलावाला असलेला बकालपणा या राज्याला भुषणावह नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य ओळखून सरकारने चवदार तळ्याचे पाणी स्वच्छ करण्याचे व साफसफाई करण्याचे तसेच चवदार तळ्याभोवती असणाऱ्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाजी शाहनवाझ खान यांचे निवेदन रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवत योग्य ते निर्देश दिले. त्यानुसार ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा ९७ वा वर्धापन दि. २० मार्चला महाड येथे साजरा होत आहे. यानिमित्ताने शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. सर्व शासकीय यंत्रणाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी (दि. १५ मार्च )जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला.
चवदार तळ्याचे आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेता कार्यक्रमाचे नियोजन दर्जेदार व उत्कृष्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी महाड ज्ञानोबा बानापुरे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नगरपरिषदेमार्फत चवदार तळे, भीमनगर, क्रांती स्तंभ, स्मारक परिसराची साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील विविध ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करावे. तसेच क्रांती स्तंभ परिसरात ५० मोबाईल शौचालये, ३० स्नानगृहे उभारण्यात यावेत. तसेच महाड ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत रुग्णवाहिका तसेच पुरेसा औषध साठा व आरोग्य पथक तैनात राहील याची दक्षता घ्यावी. याबरोबरच अखंडित वीजपुरवठा तर अनुयायींची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी.जावळे यांनी यावेळी दिल्या.
या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी. एसटी महामंडळाच्या वतीने १९ ते २१ मार्च या कालावधीत माणगाव, वीर, वामने व करंजाडी रेल्वे स्थानक ते महाड शहर अशी जादा बस व्यवस्था केली जाणार आहे. या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच या ठिकाणी येणाऱ्या अनुयायी यांना पिण्याचे पाणी, सावली साठी मंडप तसेच संपूर्ण परिसरात दिशा दर्शक फलक लावण्यात यावेत. तसेच चौकात त्याची माहिती देणारी चित्रफित बनवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अनुयायी यांना देण्यात येणाऱ्या अल्पोपाहाराची दर्जा राखावा तसेच देण्यात येणाऱ्या फूड पॅकेटची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनुयायांची संख्या लक्षात घेता कुठलीही गैरसोय होणार नाही याची सर्व शासकीय विभागानी दक्षता घेऊन नियोजन करावे असेही जावळे यांनी सांगितले.
चवदार तळे सत्याग्रह आंदोलन वर्धापनदिनानिमित्तच्या एमआयएमच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबाबत हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.