स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : पावसाळीपूर्व कामे सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमध्ये महापालिका आयुक्तांनी पाहणी अभियान राबविण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा माजी उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनाच्या सुरुवातीलाच नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची निवड झाल्याबाबत निवेदनाच्या सुरुवातीलाच सर्वप्रथम सानपाडावासियांकडून आमले यांनी अभिनंदन केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही काही दिवसांनी सानपाडा नोड, सानपाडा कॉलनी, सानपाडा पामबीच परिसर, सानपाडा गावात महापालिका प्रशासनाकडून पावसाळीपूर्व कामांना सुरूवात होईल, पण त्याअगोदर आपण दिवसाउजेडी तसेच रात्री सानपाडा नोडमध्ये पाहणी अभियान राबवावे यासाठी पांडुरंग आमले यांनी हे निवेदन सादर केले आहे.
सानपाडा नोडमध्ये गटारांची सर्वप्रथम पाहणी करावी. गटारांची वरवर नव्हे तर तळापासून सफाई होणे आवश्यक आहे व कचरा काढल्यावर तो तातडीने उचललाही जाणे आवश्यक आहे. अनेकदा डांबरीकरण होते, पण दोन-तीनदा पाऊस पडल्यावर ते डांबरीकरण उखडले जावून रस्त्यावर खड्डे निर्माण होतात. बाहेरील तसेच अंर्तगत भागातील स्ट्रीट लाईटचीही पाहणी होणे आवश्यक आहे. तसेच स्ट्रीट लाईटच्या वायरी बंदीस्त आहेत अथवा नाही याचीही पाहणी होणे आवश्यक असून नादुरुस्त स्ट्रीट लाईटची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. झाडांच्या फांद्याची आताच छाटणी होणे आवश्यक आहे. ऐन पावसाळ्यात ही कामे केली जातात. तसेच पाऊस पडल्यावर पदपथावर शेवाळ साचते. लोक घसरतात, त्यांना जखमा होतात. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर महिन्यातून एकदा तरी पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करणे आवश्यक असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपण स्वत: पाहणी अभियान राबवावे. या अभियानात सानपाड्याचा एक नागरीक म्हणून आम्हाला सहभागी करून घ्यावे, जेणेकरुन नागरी समस्या, नागरी असुविधा याबाबत स्थानिकांशी आपणास सुसंवादही साधता येईल. त्यामुळे पावसाळी पूर्व कामांचा शुभारंभ करण्यापूर्वी सानपाडा नोडमध्ये एकदा पाहणी अभियान राबविण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.