कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन मुलाला नुकसान भरपाई द्यावी मनसे महिला सेनेची मागणी
सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर – ४ येथील स्वामी मोहनणंद गिरिजा महाराज व स्वामी विवेकानंद संकुल क्रीडा मैदान येथील संरक्षक भिंतीचे बांधकाम मे. रिलायन्स इंडस्ट्रीज हा कंत्राटदार करत आहे. हे बांधकाम सुरू असताना तिथे कंत्राटदाराच्या हलगर्जपणामुळे विद्युत तार (इलेक्ट्रिक वायर) उघड्यावर पडली होती. १८ मार्च रोजी तिथे खेळायला गेलेला १३ वर्षीय मुलगा कुणाल कान्होजीया याचा पाय त्या उघड्यावर पडलेल्या विद्युत तारेमध्ये अडकून ती विद्युत तार त्याच्या हातात आली व इलेक्ट्रिक शॉकमुळे त्याच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर इजा झाली. त्यानंतर त्याला एमपीसीटी हॉस्पिटल, सानपाडा मध्ये दाखल केले. १८ मार्चपासून पैशाच्या अभावी तेथील डॉक्टर मुलाच्या बोटावर शस्त्रक्रिया करायला तयार नव्हते.
मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ यांना २६ मार्च २०२४ रोजी ही माहिती कळल्यावर त्यांनी कडक भूमिका घेतल्याने हॉस्पिटल प्रशासनाने मुलावर शस्त्रक्रिया केली. दुर्दैवाने मुलाला ३ बोटे गमवावी लागली. ही शस्त्रक्रिया वेळीच केली असती तर दोन बोटे वाचली असती. कंत्राटदार व महानगरपालिका यांच्या चुकीमुळे हा अपघात घडला. असे असून सुद्धा हॉस्पिटलमध्ये एवढे दिवस पैसे न भरल्यामुळे लहान मुलाला तीन बोटे गमवावी लागली हे अत्यंत संतापजनक आहे. मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ यांनी महानगरपालिका शहर अभियंता संजय देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व घडलेल्या घटनेचा जाब विचारला. यानंतर उप अभियंता श्री. लोकरे यांनी स्थळ पाहणी केली.
यावेळी मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ यांनी महापालिकेकडे मुलाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
संबंधित कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा ही दिला. यावेळी सोबत महिला सेना उपशहरअध्यक्ष दिपाली ढवुळ, शहरसचिव यशोदा खेडस्कर , संगीता वंजारे शाखाअध्यक्ष, भक्ती खरात, अरुणा मोरे महारष्ट्र सैनिक हे होते.