स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : उलवे नोडमध्ये होत असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावाबाबत, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
रायगड जिल्ह्यातील उलवे नोड हा नव्याने विकसित झालेला नोड आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काही अंतरावरच हा उलवे नोड आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील रहीवाशांना वीजपुरवठा खंडीत असल्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्याने तेथील रुग्णालये, शासकीय कार्यालये, दवाखाने, पेट्रोलपंप व अन्य सुविधा मिळताना अडथळे निर्माण होत आहे. सध्या उन्हाळा सुरु होवून एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. उकाड्याने लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच वीज नसल्याने घरामध्ये लोकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.उलवेवासीयांना प्रशासन मोफत वीज देत नाही. वीजेचे शुल्क आकारते. उलवेवासियांना वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असताना या समस्येचे निवारण का होत नाही? उलवेवासियांना वीज मिळण्याचा अधिकार नाही काय? अनेक दिवसांपासून ही समस्या असताना या समस्येचे निवारण का होत नाही? आपण सध्या सुरु असलेले उन्हाळ्याचे दिवस पाहता याप्रकरणी चौकशीचे आदेश देवून उलवेवासियांच्या वीजसमस्येचे निवारण करण्याचे आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.