सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : घणसोली सेक्टर चार येथील व कोपरखैराणे सेक्टर १४ येथील नागरी आरोग्य केंद्रातील असुविधांचे निवारण करण्याची लेखी मागणी नवी मुंबईचे इंटकचे अध्यक्ष व इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
घणसोली सेक्टर चार परिसरात काही महिन्यापूर्वी घणसोली सेक्टर चार व कोपरखैराणे सेक्टर १४ येथे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने नागरी आरोग्य केंद्र सुरु केली आहेत. स्थानिक रहीवाशांना त्यांच्याच परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचा महापालिका प्रशासनाचा हेतू स्तुत्य आहे. परंतु केवळ नागरी आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिल्याने महापालिका प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. त्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये काय समस्या आहेत. कोणत्या असुविधा आहेत, रुग्णांना त्याचा काय त्रास होत आहे, याची पाहणी करून समस्या व असुविधांचे निवारण करण्याचे दायित्व महापालिका प्रशासनाचे असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
घणसोली सेक्टर चार येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर आहे, परिचारिका आहेत, तथापि या नागरी आरोग्य केंद्रात काम करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करुन दिले नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी अस्वच्छता वाढीस लागली आहे. वारंवार पत्रव्यवहार करुनही प्रशासनाकडून या समस्येची दखल घेतली जात नाही. कोपरखैराणे सेक्टर १४ परिसरात महापालिका प्रशासनाने काही दिवसापूर्वीच नागरी आरोग्य केंद्र कार्यरत केले. या नागरी आरोग्य केंद्रात टेबल, खुर्ची, कपाटही नाही. या नागरी आरोग्य केंद्राला अजून वाहनही उपलब्ध करून दिलेले नाही. सुरक्षारक्षक नाहीत. सफाई कर्मचारीही नाहीत. डिपफ्रीझर/आयएलआरही नाही. त्यामुळे असुविधा व समस्या असतानाही प्रशासनाने कोपरखैराणे सेक्टर १४ येथे नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची घाई का केली? असा प्रश्न स्थानिक रहीवाशांकडून उपस्थित केला जात आहे. सुविधांमुळे कोपरखैराणे सेक्टर १४ येथील व घणसोली सेक्टर चार येथील नागरी आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर व परिचारिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या दोन नागरी आरोग्य केंद्रात भेडसावणाऱ्या समस्यांचेव असुविधांचे तात्काळ निवारण करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.