पनवेल : उलवे नोडमध्ये पेट्रोलपंपाची सुविधा उपलब्ध करुन देण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या १५ वर्षामध्ये उलवे नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरणाची प्रक्रिया विकसित झाल्याने या ठिकाणी लोकसंख्येतही प्रचंड वाढ झालेली आहे. या ठिकाणी इमारतींचे जाळे वेगाने वसले असले तरी नागरी सुविधांसाठी व समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी वास्तव्यास आलेल्या रहीवाशांना आजही संघर्ष करावा लागत आहे. ज्या ठिकाणी नवीन भाग विकसित होत असेल त्या ठिकाणी सुविधा पुरविण्याची, समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. पण हीच जबाबदारी सांभाळण्यास प्रशासनाने उदासिनता दाखविल्याने उलवेवासियांना आज अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
उलवे नोडमध्ये आजतागायत कोठेही पेट्रोलपंपाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे उलवेवासियांना पेट्रोल, डिझेल व सीएनजीसाठी बेलापुर, पनवेल, उरणच्या पेट्रोलपंपाकडे जावे लागत आहे. येथे अधिकृत पेट्रोलपंप नसला तरी उलवे नोडमध्ये १० ते १२ ठिकाणी २५ रुपये प्रती लीटर दराने पाहिजे तितके पेट्रोल अनधिकृतरित्या बाटल्यामध्ये उपलब्ध होत आहे. या ठिकाणांहून अटल सेतूकडे वाहने मोठ्या संख्येने ये-जा करतात. मध्येच कोणाचे इंधन संपल्यास त्यांना काळ्या बाजाराने डिझेल-पेट्रोल विकत घ्यावे लागते. या ठिकाणी पेट्रोलपंपासाठी भुखंड राखीव आहे. मात्र गेल्या दीड-दोन दशकात येथील परिसर विकसित होऊनही पेट्रोलपंच कार्यरत न झाल्याने येथील रहीवाशांना इंधनासाठी बेलापुर, पनवेल, उरणच्या पेट्रोलपंपावर रांगा लावण्याची वेळ आली आहे. आपण उलवेवासियांची समस्या सोडविण्यासाठी राखीव असलेल्या जागेवर लवकरात लवकर पेट्रोलपंप सुरु करण्यासाठी निर्देश देवून उलवेवासियांना दिलासा देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.