नवी मुंबई : रमजान ईदनिमित्त एमआयएमच्या वतीने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत रिक्षा सेवा, तसेच गरीबांसाठी व अनाथ मुलांसाठी मोफत बिर्याणी वाटप अशा विविध लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे जनसामान्यांची सेवा करण्याचा आमचा हेतू सफल झाला असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी दिली.
रमझान ईदनिमित्त ‘ईद ए मिलन’ या उपक्रमाअंर्तगत एमआयएमच्या वतीने गुरुवारी, ११ एप्रिल रोजी नेरूळमध्ये सकाळपासून रात्रीपर्यत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत रिक्षा सेवेचे, तसेच गरीबांसाठी व अनाथ मुलांसाठी मोफत बिर्याणी वाटपाचे आयोजन एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी केले होते.
एमआयएम व हाजी शाहनवाझ खान फांऊडेशनच्यावतीने रमझान ईद निमित्त ‘ईद ए मिलन’ उपक्रमांतर्गत नेरूळ रेल्वे स्टेशन पूर्व ते डीवाय पाटील रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकासाठी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यत मोफत रिक्षा सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा शेकडो रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी लाभ घेतला. तसेच नेरूळमधील गरीबांसाठी तसेच भिक्षेकऱ्यांसाठी मोफत बिर्याणी वाटपही नेरूळमध्ये करण्यात आले. ५ हजाराहून अधिक लोकांना एमआयएमकडून बिर्याणी वाटप करण्यात आले. याशिवाय नेरूळमधील अनाथाश्रमातील मुलांना जेवण व फळवाटप करण्यात आले असल्याची माहिती हाजी शाहनवाझ खान यांनी दिली आहे. या कार्यक्रमास आसिफ शेख यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.