नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ, जुईनगर, शिरवणे नोडमध्ये पोलीस गस्त वाढविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी नेरूळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांंकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. अनेकांच्या शालेय व महाविद्यालयीन परिक्षा संपल्या आहेत. परिक्षा संपल्यावर अनेक जण सहकुटूंब गावी जातात तर काही घरातील महिला व मुले गावी जातात. त्यामुळे अधिकांश गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सदनिका महिना-दीड महिने बंदच असतात, तर अनेक सदनिका दिवसभर अगदी रात्री उशिरापर्यत बंदच असतात. याचाच फायदा उचलत चोर. भामटे पाळत ठेवून घरफोडी करत असतात. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी नेरूळ नोड, जुईनगर नोड, शिरवणे गाव परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे आवश्यक आहे. तसेच उन्हाळा कालावधीत सोसायटीतील रहीवाशांना काय काळजी घ्यावी याबाबतही पोलीसांकडून मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. नेरूळ, जुईनगर व शिरवणे गावामधील गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करुन त्यांनाही गस्त घालण्यास प्रवृत्त करावे. उन्हाळा कालावधीत घरफोड्या, चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नेरूळ, जुईनगर व शिरवणे गावामध्ये पोलिसांनी सांयकाळनंतर सकाळपर्यत गस्त वाढवण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी नेरूळ पोलीसांकडे केली आहे.