एमआयएमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
पनवेल : तळोजा फेज १ परिसरातील पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी तसेच बामणडोंगरी परिसरात नालेसफाईसाठी स्थानिक प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
पनवेल तालुक्यातील तळोजा फेज १ या परिसराचे नागरीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होऊन येथील निवासी लोकसंख्याही प्रचंड वाढलेली आहे. सिडकोने या ठिकाणी निवासी सुविधा उपलब्ध करुन देताना या भागात इमारतींचे जाळे निर्माण केले आहे. मात्र त्या भागात नागरी व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास सिडकोने उदासिनता दाखविल्याने येथे वास्तव्यासाठी आलेल्या रहीवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यापासून या भागात पिण्याचे पाणी रहीवाशांना मिळत नाही. टॅकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. पावसाळा अजून सव्वा ते दीड महिना लांब आहे. पाण्यासारखी सुविधाही या ठिकाणी सिडकोने उपलब्ध करून न दिल्याने नागरिकांना खिशाला झळ देवून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. टॅकरच्या पाण्यामुळे रहीवाशी व त्यांच्या परिवाराला विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी स्थानिक भागातून करण्यात येत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण सिडको व स्थानिक पनवेल महापालिका प्रशासनाला तळोजा फेज १ परिसरात माफक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.
उरण तालुक्यातील बामणडोंगरी परिसरात नालेसफाईच्या कामाला अजून सुरुवात न झाल्याने रहीवाशांना दुर्गंधीचा व डासांचा सामना करावा लागत आहे. पावसाळा आता जेमतेम सव्वा ते दीड महिन्यावर आलेला आहे. नालेसफाई वेळीच न झाल्यास पाणी तुंबूंन बामणडोंगरी परिसर जलमय होण्याची भीती आहे. तळोजा फेज १ परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी व बामणडोंगरी परिसरातील नालेसफाई करण्यासाठी आपण त्या त्या स्थानिक प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.