एमआयएमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे
सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएमचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडी , महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, पनवेल-उरणच्या तुलनेत नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. वाशीतील खाडी परिसरात, सिडकोनिर्मित एनआरआय वसाहतीलगतच्या खाडीमध्ये, पामबीच लगतच्या तलावामध्ये आपणास नेहमीच फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोचे स्टॅच्यू व फोटो तसेच फलक दिसून येतात. यामुळेच नवी मुंबई शहराला फ्लेमिंगोचे शहर म्हणून गेल्या काही काळापासून ओळखले जात आहे. परंतु गेल्या दिवसात विविध कारणास्तव फ्लेमिंगो मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फ्लेमिंगोंना जवळून पहावयास मिळणे ही नवी मुंबईकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. या फ्लेमिंगोंचे रक्षण करणे, संवर्धन करणे ही नवी मुंबईकरांची, सिडकोची, नवी मुंबई महापालिका प्रशासनाची व राज्य सरकारचीही जबाबदारी आहे. फ्लेमिंगोंच्या मृत्यूच्या घटना न थांबविल्या गेल्यास व त्यावर उपाययोजना करुन तोडगा न काढल्यास नजीकच्या भविष्यात फ्लेमिंगो या शहरात पहावयासही मिळणार नाहीत. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये फ्लेमिंगोचे वास्तव्य असलेल्या भागातील परिसराची विक्री न करण्याचे सर्वप्रथम सिडकोला निर्देश द्यावेत आणि नवी मुंबई शहरात फ्लेमिंगोच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.