नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये प्रदूषण पसरविणाऱ्या सायन-पनवेल मार्गावरील तुर्भे येथील उड्डाणपुलावरील चुकीच्या पद्धतीने होणारे तोडकाम तातडीने थांबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (सायन-पनवेल महामार्ग), नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलाश शिंदे व नवी मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे येथील उड्डाणपुलाचे गेल्या काही दिवसापासून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील तोडकाम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराच्या माध्यमातून सुरु आहे. हे तोडकाम नियमानुसार होत नसून चुकीच्या पद्धतीने सुरु असल्यामुळे नवी मुंबईतील प्रदूषणात यामुळे वाढ झाली असून सभोवतालच्या परिसरातील नवी मुंबईकरांच्या व तेथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हे तोडकाम कॉलम वाचवून करणे आवश्यक आहे. हे तोडकाम आधुनिक पद्धतीने होत नाही. कॉलमला तडे जाता कामा नये. हे गांभीर्य मी सर्वप्रथम आपल्या निदर्शनास आणून देत आहे. ज्या ठिकाणी तोडकाम सुरु असेल, तो भाग जमिनीपासून काही अंतरावर पत्रे टाकून, ग्रीन नेट वापरुन अथवा अन्य उपाययोजना करुन तेथील काळजी घेणे आवश्यक असते. जेणेकरून सभोवतालाच्या परिसरात धुळीचे लोट पसरुन श्वसनाचे व अन्य विकार होऊ नयेत यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असते. तसेच तोडकाम करताना पिलर व अन्य ठिकाणीही विचित्र परिस्थिती झालेली आहे. या तोडकामामुळे प्रदूषण वाढीस लागले असून आपण तातडीने याठिकाणी पाहणी अभियान राबवावे व या अभियानात आम्हालाही सहभागी करून घ्यावे की ज्यायोगे या समस्येचे गांभीर्य आम्हाला आपल्या निदर्शनास आणून देता येईल. पर्यावरणाची हानी होणार नाही व प्रदूषणात वाढ होणार नाही अशा पद्धतीने तोडकामास सुरुवात होणार नाही, तोपर्यत संबंधितांना या ठिकाणी काम करू नये व सुरु असलेले काम तातडीने थांबविण्याचे निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.