अखिल भारतीय माथाडी संघटनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील महापालिका उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत असलेले कचऱ्याचे ढिगारे तातडीने हटविण्यासाठी संबंधिताना आदेश देण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्हा माजी उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ७ मध्ये महापालिकेचे संत शिरोमणी तुकाराम महाराज उद्यान आहे. समस्या मांडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की, उद्यान, क्रिडांगण, महापालिकेची रुग्णालये, समाजमंदीर, ग्रंथालय, मार्केट, वाहनतळ
या महापालिका मालकीच्या सार्वजनिक जागांची स्वच्छता व डागडूजी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी करणे शक्य नसेल तर किमान या सार्वजनिक जागांना साधु संत, राष्ट्रपुरुष, महामानव, स्वातंत्र्यसेनानी यांची नावे यापुढे देण्यात येऊ नये. कारण या नावांसोबत लोकांची भावना जोडलेली असते. उद्या या नाव दिलेल्या वास्तूंना बकालपणा आल्यास समाज नाराज व संतप्त होईल व याचा उद्रेक झाल्यास महापालिका प्रशासनाला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा पांडुरंग आमले यांनी निवेदनातून दिला आहे.
सानपाडा सेक्टर ७ मध्ये महापालिकेचे संत शिरोमणी तुकाराम महाराज उद्यानाकडे आपण गेल्यास गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाच्या प्रवेशद्वारालगतच गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे पडलेले आपल्या निदर्शनास येईल. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसराला बकालपणा आला असून डासांचा उद्रेकही वाढीस लागला आहे. उद्यानात ये-जा करणाऱ्यांना तसेच पदपथावरुन ये-जा करणाऱ्यांना या डासांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्या कचऱ्यातून पहाटे व रात्री जवळच्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. हा विभाग मराठी भाषिकांचा असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत असते. त्यातच या उद्यानाला जगतगुरु तुकोबा रायांचे नाव महापालिका प्रशासनाने दिले असून प्रवेशद्वारावरच गेल्या काही दिवसापासून कचऱ्याचे ढिगारे असल्याने स्थानिक लोकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती संतापाची भावना व्यक्त केली जात असून लोकभावनेचा उद्रेक झाल्यास लोक हाच कचरा पालिका विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा आणून टाकण्याची भीती आहे. त्यामुळे काही चुकीचा प्रकार घडल्यास त्यास महापालिका प्रशासनाची उदासिनताच जबाबदार असेल. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता व लोकभावनेचा उद्रेक होण्याची शक्यता पाहता आपण उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत असलेले कचऱ्याचे ढिगारे हटवून त्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.