नवी मुंबई : नवी मुंबईकरांशी सुसंवाद ठेवण्यासाठी ‘आयुक्त आपल्या दारी’ हे अभियान सुरु करण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना नागरी समस्या सोडविण्याचे व नागरी सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील श्रीमंत महापालिकांमध्ये नवी मुंबई महापालिकेची गणना होत आहे. मोरबेसारखे स्वमालकीचे धरण या महापालिकेचे आहे. केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य जनतेला आपणास भेटण्याची इच्छा असली तरी कार्यव्यस्ततेमुळे आपणास भेटता येत नाही. सुसवाद साधता येत नाही. महापालिकेत आयुक्तांसह अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी केवळ राजकारणी, ठेकेदारच प्रामुख्याने येत असतात. सर्वसामान्य जनता महापालिकेत येण्याचे प्रमाण अत्यल्प व तुरळकच असते. कारण शनिवार, रविवार सर्वसामान्यांना सुट्टी असते. त्याच वेळी महापालिका कार्यालयही बंद असते. त्यामुळे पालिका आयुक्त व सर्वसामान्य नवी मुंबईकरांची गाठ-भेट होत नाही, सुसंवाद होत नाही. समस्यांबाबत मेल केल्यावर आयुक्त कार्यालयातून अनेकदा समस्यांचे निवारन होतच नाही, केवळ मेल फॉरवर्ड करण्याचे काम केले जाते. काम झाले अथवा नाही हे जाणून घेण्याची तसदीही आयुक्त कार्यालयाकडून घेतली जात नाही.हा आमचा अनुभव असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
मध्यंतरीच्या काळात तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे सर यांनी स्वत:हून सर्वसामान्य नवी मुंबईकरांना भेटण्यासाठी पुढाकार घेतला होता. ‘आयुक्त आपल्या दारी’ हे अभियान चालविताना दर शनिवारी वेगवेगळ्या नोडमधील उद्यानात जावून तेथील स्थानिक लोकांच्या तुकाराम मुंढे हे भेटीगाठी घेत असत, नवी मुंबईकरांच्या समस्या जाणून घेत असत. त्यामुळे सकाळच्या वेळी अगदी ८ वाजता सर्वसामान्यांना मुंढे सरांना भेटणे, समस्या सांगणे शक्य होत असे. त्यानंतर ही प्रथा खंडीत झाली आणि आयुक्तांचा व नवी मुंबईकरांचा सुसंवादही खंडीत झाला. आपणाकडून नवी मुंबईकर खूप आशावादी आहेत. वेळेअभावी त्यांना महापालिका मुख्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण स्वत: पुढाकार घेऊन नवी मुंबईकरांच्या भेटीसाठी अभियान सुरु करावे, अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.