जयसिंगपूर : आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे जातो तिथे जनता सांगत आहेत की बाळासाहेबांच्या विचारांना आणि विकासाला आम्ही मत देणार. त्यामुळे येथेही धन्युष्य बाणाच्या खटक्यावर बटन दाबून जनता उबाठाचा टांगा पलटी घोडे फरार करेल. निवडणुकीत मशालीची चिलीम होईल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जयसिंगपूर येथे महायुतीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर येथून अपक्ष निवडून येतात कारण त्यांचे काम बोलते. कमी बोलणे आणि जास्त काम करणे ही त्यांची ओळख आहे. तसेच काम धैर्यशील माने यांनी केले आहे. यड्रावकर है तो सबकुछ भी मुमकिन है. धनुष्यबाणाशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का ? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारांना माफ करणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना केला.
महापुराची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. महापूर आता येणार नाही. पूर येऊ नये म्हणून ३२ कोटींचा डीपीआर केला आहे. महापुरात जीवाची पर्वा न करता आम्ही मदत करत होतो. एका ठिकाणी पाहिले की एक शेतकरी पहिल्यामाळ्यापर्यंत पाणी आले म्हणून दुसऱ्या माळ्यावर गेले होते. त्यांच्या सोबत त्यांचे गोधन ही होते. ते म्हणाले हा आमचा परिवार आहे. एका कोल्हापूरचे प्रेम बघा आणि २६ जुलैच्या मुंबईत आलेल्या पुरावेळी बाळासाहेबांना सोडून काहीजण पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले होते. कोल्हापुरकरांचे प्रेम कुठे आणि उबाठाचे बाळासाहेबांबद्दल प्रेम कुठे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
मौलाना आझाद मंडळासाठीचा निधी ३० कोटींवरुन ५०० कोटींची तरतूद केली आहे. विकास करताना जातीभेद केला नाही. या राज्यातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. कोल्हापुरातील टोल बंद करण्याचा निर्णय आपण घेतला होता. मराठा समाजाला आपण आरक्षण दिले. विरोधकांनी सत्तेत असताना फक्त मराठा समजाचा वापर केला. हे सरकार देणारे सरकार आहे. तुम्ही एक हाताने दिले तर सरकार तुम्हाला दोन हाताने देईल. आपले सरकार बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले. इतकी वर्ष सत्तेत असताना काँग्रेसला संविधान दिन साजरा करावा वाटला नाही. आता म्हणतात संविधान बदलणार पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान नाही बदलणार, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हे महायुतीचे सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार आहे, असे ते म्हणाले.
शिरोळ तालुक्यातील ५० किलोमीटरचे रस्ते, प्रस्तावित एमआयडीसीबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पूर्वीचे सरकार कमिशन आणि कट मागू लागले तसे उद्योजक राज्यातून पळून गेले. पण महायुतीचे सरकार आल्यानंतर उद्योजक पुन्हा राज्यात येत आहेत. केंद्रात १० वर्षात केलेले काम आणि राज्यात दोन वर्षात केलेले काम याची पोचपावती मतदारांनी दिली पाहिजे. धैर्यशील माने हक्काचा उमेदवार आहे.
कागलमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, कोल्हापूर शक्तीपीठ आहे. या शक्ती पीठामध्ये खोटे पणाला कट कारस्थानाला स्थान नाही. कोल्हापूरकरांनी यापूर्वी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकलेली आहे. काँग्रेसचे उमेदवार मतदार संघ शोधत आहेत. वायनाड नंतर आता रायबरेली कारण त्यांना स्वतःच्या विजयाची खात्री उरलेली नाही, असे लोक देशाचे काय नेतृत्व करणार अशी टीका मुख्यमंत्र्यानी केली.
ते पुढे म्हणाले की आपल्याला 56 इंचाची छाती असणारा पंत प्रधान हवा आहे. संजय मंडलिक यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत आहे. महाराजांच्या वारसांना राज्यसभेचे तिकीट दिले नाही याबाबत उबाठानी शेण खाल्ल्याची कबुली दिली. राम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या सोबत हातमिळवणी करून त्यांनी तेच खाल्ले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 2019 मध्ये बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस सोबत घरोबा केला आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात केला. जनतेने शिवसेना भाजप युतीसाठी मतदान केले होते. कागलमधून मंडलिक यांना सर्वाधिक लीड मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरची पूर समस्या कायमची मिटवण्यासाठी सरकारने वर्ल्ड बँकेकडून 3200 कोटींचे कर्ज घेतले आहे. ते पुढे म्हणाले की आपले सरकार फिल्डवर जाऊन काम करणारे आहे.