पनवेल : राज्यात महाराष्ट्र दिन हा ध्वजारोहण तसेच सामाजिक कार्यक्रमांनी साजरा होत असताना एमआयएमच्या वतीने उलव्यात फिनिक्स हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांना गुलाबपुष्प देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यासह उलव्यातील अन्य खासगी दवाखान्यांतही एमआयएमच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
एमआयएमचे नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांना श्रद्धाजंली वाहत हाजी शाहनवाझ खान यांनी उलवे नोडमध्ये आरोग्य दूतांचा सत्कार करण्याच्या अभियानास शुभारंभ केला. आरोग्य रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कार्याचा गौरव महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती हाजी शाहनवाझ खान यांनी दिली. यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.