नवी मुंबई : पावसाळा आता अवघ्या काही तासावर आला असल्याने नेरूळ सेक्टर सहा परिसरात पावसाळापूर्व नागरी कामे युद्धपातळीवर करण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
आता अवघ्या काही तासांनीच पावसाळा सुरु होतोय. शहरात सर्वत्र पावसाळीपूर्व कामांना गती आलेली आहे. नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगतच, प्रवेशद्ववारासमोर पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी मोठी गटारे आहेत. त्या गटारांची तळापासून तातडीने सफाई करून त्यातील कचरा हटविणे आवश्यक आहे. याशिवाय दर्शन दरबार रोड ते समाजमंदीर , मेरेडीयन सोसायटी ते सारसोळे गावातील मच्छिमार्केट यादरम्यानच्या अंर्तगत रस्त्यावर असणाऱ्या मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात मल:निस्सारण वाहिन्यांचे चेम्बर्स चोकअप झाल्यावर ते सांडपाणी झाकणातून बाहेर मोठ्या प्रमाणावर वाहत असते. हे पाणी सिडको सोसायट्यांच्या अंर्तगत भागातही हे सांडपाणी येते. या दुर्गंधीमुळे रोगराई वाढते. याशिवाय वृक्षछाटणी अजून झालेली नाही. गेल्या वर्षी याच विक्रम बार ते समाजमंदिरादरम्यानच्या रोडवर वरुणा सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगतच असलेले एक झाड वाहनावर कोसळून वाहनाची हानी झाली होती.
पावसाळा आता अवघ्या काही तासावर आला असल्याने गटारांची साफसफाई, मल:निस्सारण वाहिन्यांची साफसफाई, वृक्षछाटणी आदी कामे नेरूळ सेक्टर सहामध्ये करण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.