नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील अनधिकृत होर्डिग्जप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल मिळण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड ,सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मुंबईतील घाटकोपर विभागात झालेल्या होर्डिग्ज दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीतील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या सार्वजनिक जागांवरील, रेल्वे स्टेशनसमोरील, सिडकोच्या वाहन पॉर्किगमधील अनेक अनधिकृत होर्डिग्ज हटविण्यात आले आहेत. घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली नसती तर पुढील अनेक वर्षे या अनधिकृत होर्डिग्जला पालिका प्रशासनाकडून अभय मिळाले असते. राजाश्रयही मिळाला असता. मुळात हे होर्डिग्ज अनधिकृत आहेत. विनापरवानगी आहेत, मुदत संपल्यावरही ते उभे आहेत, याची महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना इंत्यभूत माहिती होती. या अनधिकृत होर्डिग्जमुळे शहराला वर्षानुवर्षे बकालापणा तर आलाच होता, पण महापालिका प्र्रशासनाचाही लाखो-करोडो रुपयांचा महसूल इतक्या वर्षांमध्ये बुडालेला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांमध्ये हटविण्यात आलेल्या होर्डिग्जची संख्या व स्थळ यासोबतच हे अनधिकृत होर्डिग्ज लावणाऱ्यांवर काय कारवाई केली आहे? फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत का. आर्थिक दंड वसूल केले आहेत का? याची माहिती नवी मुंबईकरांच्या माहितीस्तव प्रकाशित करण्यात यावी. अनधिकृत होर्डिग्ज लावणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. पण वर्षानुवर्षे हे होर्डिग्ज अनधिकृत असतानाही कारवाई न करणाऱ्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांना होर्डिग्जवाल्यांकडून काही मिळत होते का, या अनुषंगानेही महापालिका प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर चौकशी करणे आवश्यक आहे. महापालिका अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर याप्रकरणी चौकशी करुन कारवाई केल्यास यापुढे नवी मुंबई शहरात अनधिकृत होर्डिग्जची समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे आजवर शहरात झालेल्या होर्डिग्जच्या कारवाईचा अहवाल, फौजदारी गुन्हे अथवा आर्थिक दंड याबाबत नवी मुंबईकरांच्या माहितीस्तव पालिका प्रशासनाने माहिती प्रकाशित करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.