सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील विविध समस्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधताना समस्या सोडविण्याचे साकडे घातले आहे.
आमदार मंदाताई म्हात्रे या नवी मुंबईतील समस्यांवर करत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी महाराष्ट्र भवन व सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजबाबत लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त व सिडको एम.डी. यांना आदेश दिले. तसेच वाशी सेक्टर- ८ व बेलापूर सेक्टर- १२ येथे नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.
नवी मुंबई येथील पर्जन्य जलउदंचन केंद्र लवकरच उभारले जाणार असून हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर बेलापूर, सीबीडी, वाशी परिसरातील पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नसल्याने त्याला पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन पावसाळी जलउदचंदन केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच सीबीडी या परिसरात पावसाळ्यादरम्यान पाणी साचते. त्यामुळे सीबीडी येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने येथील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्याचे कामे हाती घेतली आहेत. वाशी येथील जलउदंचन केंद्राचे अपेक्षित खर्च ३७ कोटी ३१ लाख व बेलापूर जलउदंचन केंद्राचे अपेक्षित खर्च ३४ कोटी ५३ लाख इतका येणार आहे. तसेच वाशी व बेलापूर या याठिकाणी जलउदंचन केंद्राचे लवकरच सुरु होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.