अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शाळेतील मुलांना झालेल्या गणवेश विलंब प्रकाराची चौकशी करण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेची राज्यातील सधन महापालिकेमध्ये गणना होत आहे. मोरबेसारखे स्वमालकीचे धरण असणारी ही महापालिका आहे. केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने या महापालिकेला पारितोषिकांचा वर्षाव होत असतो. या शहरात बालवाडी ते पदवी, अभियांत्रिकी, विधी, वैद्यकीय, मरीन अॅकॅडमी अशा नानाविश शैक्षणिक सुविधांचे जाळे येथे असल्याने पुण्यापाठोपाठ नवी मुंबईला विद्येचे माहेरघर संबोधले जात आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून पालिका शाळेतील मुलांना इंग्रजी माध्यमाचे तेही सीबीएसईचे शिक्षण देण्यात येत आहे. आता ऑगस्ट महिना उजाडला तरी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून पालिका शाळेतील मुलांना अजून गणवेश वाटप झालेले नाही. ही बाब नवी मुंबई महापालिका प्रशासनासाठी भूषणावह नाही. शाळा सुरु होताच गणवेश वाटप होणे आवश्यक आहे. पालिका शाळेतील मुलांना गणवेश वाटपास झालेल्या विलंबाची आपण चौकशी करावी व प्रशासकीय पातळीवर विलंबप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.