सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा लवकर निर्णय घेऊन बाजार आवारातील घटकांच्या डोक्यावर असलेली मृत्यूची टांगती तलवार दूर करण्याची लेखी मागणी भाजयुमाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, धान्य मार्केट, किराणा दुकान मार्केट कार्यरत आहेत. या पाच मार्केटमध्ये असणाऱ्या कांदा बटाटा मार्केटची अवस्था धोकादायक आहे. महापालिका प्रशासनाने हे मार्केट धोकादायक घोषित करुनही दोन दशकापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही कांदा, बटाटा, लसून विक्रीसाठी येत आहे. मार्केटमध्ये दररोज व्यापारी, माथाडी, मापाडी, वारणार, मेहता कर्मचारी, पालावाल महिला, बाजार समितीचे कर्मचारी-अधिकारी, ट्रान्सपोर्ट वर्गातील बाहेरगावचे वाहतुकदार, क्लिनर तसेच स्थानिक वाहतुकदार, किरकोळ विक्रेते अशा स्वरूपात दररोज ५० हजाराहून अधिक जिवित घटकांचा वावर असतो. मार्केट कार्यरत झाल्यापासून गाळ्यात छतातून वाळू गळणे, स्लॅप कोसळणे, भिंतीतून लोखंडी सळ्या बाहेर येणे, वाहन लावण्याच्या धक्क्यावर समस्या निर्माण होणे अशा घटना सातत्याने घडतच गेल्या आहेत. मुळातच हे मार्केट बनवितानाच सिडकोने निकृष्ठ दर्जाचे बनविल्याने मार्केट कार्यरत झाल्यापासून बांधकामविषयक दुर्घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामध्ये धोकादायक मार्केटचा भाग कोसळल्यास जिवितहानी अटळ आहे. समस्येचे गांभीर्य पाहता बाजार आवारातील संभाव्य जिवितहानी टाळण्यासाठी आपण बाजार समिती आवारातील धोकादायक घोषित केलेल्या कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याची मागणी माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.