स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन-चार तसेच जुईनगर सेक्टर २३ मध्ये महापालिका उद्यानात वाढलेले जंगली गवत हटविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर चार येथे महापालिका विभाग कार्यालयासमोर तसेच नेरूळ सेक्टर दोन येथे एलआयजी वसाहतीच्या कॉर्नरच्या विरुद्ध दिशेला महापालिकेचे सार्वजनिक उद्यान आहे. याशिवाय जुईनगर सेक्टर २३ येथे महापालिकेचे उद्यान आहे. पावसामुळे या तीन ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगली गवत वाढीस लागले आहे. उद्यानात जंगली गवत वाढल्याने डासांचा उद्रेकही कमालीचा वाढला आहे. उद्यानात सकाळी व संध्याकाळी चालावयास येणाऱ्या रहीवाशांना या डासांमुळे मलेरिया व डेंग्यू या साथीच्या आजाराचा सामना करावा लागला आहे. या उद्यानालगतच खाडी, नाले असल्याने नाग, सापही अनेकदा उद्यानात स्थानिक रहिवाशांना दिसले आहेत. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच इतरांनाही सर्पदंश होण्याची भीती आहे. जंगली गवतामुळे उद्यानाला बकालपणाही आलेला आहे. समस्येचे गांभीर्य पाहता नेरूळ सेक्टर दोन-चार तसेच जुईनगर सेक्टर २३ मध्ये महापालिका उद्यानात वाढलेले जंगली गवत हटविण्याचे तात्काळ संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.