बदलापुरच्या शाळेमध्ये दोन चिमुरड्या मुलींच्या बाबतीत लैंगिक शोषणाची घटना ही मुळातच संतापजनक बाब आहे. ज्या शाळेमध्ये विद्यार्जनासाठी आपण मुलींना पाठवितो, त्या शाळेतच मुली सुरक्षित नसतील, पावलापावलावर विकृत नराधम फिरत असतील, तर मुलींच्या सुरक्षिततेसाठी अजून गंभीर उपाययोजना कराव्याच लागतील. मुळात या घटनेच्या खोलात जावून पाहिले तर शाळेमध्ये असलेल्या अनेक त्रृटी, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, उदासिनता कारणीभूत आहेत. शाळेत सीसीटीव्ही यंत्रणाच नसल्याने नराधमाचे कृत्य लवकर उजेडात आले नाही. शाळेचे प्रसाधनगृह एका कोपऱ्यात आडबाजूला असल्याने तेथे चालणारी दुष्कृत्य नजरेआड होतात. याशिवाय मुलींना प्रसाधनगृहामध्ये ने-आण करण्यासाठी महिला कर्मचारी आवश्यक असताना पुरुष कर्मचारी ठेवणे धोकादायक असते, याची जाणिवही शालेय प्रशासनाला असू नये, ही खरोखरीच शोकांतिका आहे. गुड टच, बॅड टच हे प्रबोधन करुनही मुलींवर अत्याचार होतच आहेत. आता नराधमांच्याविरोधात कायदे कडक करण्याची गरज आहे. कठोरात कठोर शासन व अशा गुन्ह्यांचा निकालही तातडीने लागणे तितकेच गरजेचे आहे. वासनांध, कामांध विषवल्ली वेळीच ठेचून काढणे काळाची गरज आहे. मुळातच आपल्या घरातील मुलींना आपण विकृत नजरेने पाहत नाही, सन्मानाने पाहतो, तशीच नजर व भावना प्रत्येक मुलीकडे व महिलेकडे पाहण्याची असली पाहिजे. पण विकृत प्रवृत्तींमध्ये आता प्रबोधनाने सुधारणा होणार नाही. त्यांच्यावर कायद्याचा वचक राहीलाच पाहिजे. अपप्रवृत्तींना धडा शिकविल्यास अन्य कोणी अशी कृत्ये करण्यास धजावणार नाहीत. शिवकालीन कायद्याची गरज आहे. महिला, मुलींची छेडछाड, विनयभंग, अत्याचार करणाऱ्यांचे हातपात तोडून, त्यांची जीभ छाटून त्यांना खरेतर भरचौकात फेकून देणे आवश्यक आहे. घटनेत तशी तरतूद नसली तरी आज ते करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या, अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. याचा अर्थ या नराधमावर कोठेतरी कायद्याचा धाक आणि पोलिसांची भीती कमी होत चालली आहे. महिला व मुली घरात तसेच शाळेत, कार्यालयात सुरक्षित राहील्या नाहीत. वासनांध, कामांध अपप्रवृत्तींचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. आपल्या मुलींना शिक्षणासोबत स्वरक्षणाचे, सुरक्षेचे शिक्षण दिले पाहिजे. आपल्या मुलींमध्ये व आपल्यात एक विश्वासाचे नाते तयार करा की जेणेकरुन मुलींचा काही वाईट अनुभव आल्यास त्यांनी आपल्याला तात्काळ माहिती दिली पाहिजे. अनेकदा त्रास होत असतानाही भीतीपायी महिला व मुली त्याची कोठे वाच्यता करत नाहीत. त्यातूनच या नराधमांचे धाडस वाढीस लागते. पर्यायाने अशा घटना वाढीस लागतात. आपल्या मुलींची आपण काळजी घेतो, तशीच काळजी समाजात वावरताना इतरांच्याही मुलींची, महिलांची घ्या. केवल आपल्याच मुलींचे पालक बनू नका, तर समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुलीचे पालकत्व स्विकारा, जबाबदारी स्विकारा. ही मानसिकता प्रत्येकाची बनल्यास अशी दुष्कृत्ये करण्यास नराधम धजावणार नाहीत. समाजात वावरताना मुली तसेच महिलांमध्ये एकप्रकारचा आत्मविश्वासही वाढीस लागेल. अशा नराधमांना माफी नाही तर ठेचून काढण्याची वेळ आली आहे.
अशी दुष्कृत्ये करणारा गुन्हेगाररुपी पशूच असतो, त्याला दयामाया कदापि देता कामा नये. गुन्हेगाराचा जात-धर्म-विचारधारा नसते. तो केवळ नराधमच असतो. त्या विषारी प्रवृत्तींच्या कृत्याबाबत प्रत्येकाच्या मनात संताप निर्माण झालाच पाहिजे.
- जयेश खांडगेपाटील
- मु.पो पिंपळगाव, ता. जुन्नर, जि. पुणे