स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका अवघ्या अडीच-पावणेतीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. आचारसंहिता लागण्याअगोदरच ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बेलापुर विधानसभा मतदारसंघील राजकीय वातावरण स्फोटक होऊ लागले आहे. बेलापुर विधानसभा लढविण्यासाठी महायुतीतील भाजपा व शिंदे गट शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. भाजपामध्ये बेलापुरच्या तिकिटसाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने तिकिट वाटप भाजपाच्या वरिष्ठांसाठी डोकेदुखी बनणार आहे.
महाविकास आघाडीकडे भाजपामधील दोन मातब्बर आणि शिंदे गटातील एका मातब्बराच्या तुलनेत विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नाही. महाविकास आघाडीकडे शरद पवार राष्ट्रवादीकडून तुर्भेतील चंद्रकांत पाटील,कॉंग्रेसकडून कामगार नेते रविंद्र सावंत, उबाठाकडून विठ्ठल मोरे यांच्या नावाची चर्चा असली तरी विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज देण्याइतपत ही नावे सक्षम नाहीत. अजित पवार गटाकडून नामदेव भगत हे मातब्बर नेतृत्व असले तरी जागावाटपात ही जागा भाजपाला जाणार आणि नाईक-म्हात्रे या राजकीय साठमारीपासून नामदेव भगत अलिप्त राहणार असून महायुती देईल त्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे नामदेव भगत यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. अन्य काही नावे उमेदवारीसाठी चर्चेत असली तरी पाच आकडी मतदानाचा आकडा गाठण्यासाठी त्यांची दमछाक होणार आहे. मागील २०१९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेचा उमेदवार उभा नसल्याने बेलापुरमधील शिवसेनेच्या मतदारांनी भाजपाला मतदान न करता इतरांना मतदान केले होते.
भाजपाकडून विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनाच तिकिट मिळणार असल्याच्या बातमीला प्रदेश पातळीवरील काही घटकांकडून दुजोरा मिळत असला तरी भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनाही पक्षातील वरिष्ठांकडून सिग्नल मिळाल्याशिवाय ते इतकी खुलेआमपणे जोरदार तयारी करणार नसल्याचे नाईक समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. बेलापुरमधील तिकीट ही आता नाईक व म्हात्रे या दोन गटासाठी राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. महायुतीत या जागेवर विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे या भाजपाच्या असल्याने जागावाटपामध्ये शिंदे गटाला ही जागा मिळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. शिंदे गट शिवसेनेकडून विजय नाहटा हे बेलापुरसाठी जोरदार तयारी करत असून त्यांनी बेलापुर मतदारसंघात गेल्या काही महिन्यापासून संघटना बांधणीचा व विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे.
बेलापुर मतदारसंघात म्हात्रे व नाईक या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी केली जात असून विविध कार्यक्रमांचा धडाका लावला जात आहे. भाजपामधील तिकिटवाटपातील चुरशीमुळे आपले सीट सहज लागेल अशी स्वप्ने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या राजकीय घटकांना पडू लागली आहेत. नाईक-म्हात्रे वादात ज्याला भाजपा तिकिट नाकारेल, तो महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात सुरु झाली आहे. मंदा म्हात्रे आणि संदिप नाईक यांनी आपल्या राजकारणाचा गणेशा नगरसेवक म्हणून नवी मुंबई महापालिकेतूनच सुरु केला होता. मंदा म्हात्रे या एकवेळ विधान परिषद तर दोन वेळा विधानसभा आमदार बनल्या आहेत. संदिप नाईक हेही दोन वेळा ऐरोली मतदारसंघातून आमदार बनले आहेत. संदीप नाईक हे भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत तर मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षपद सांभाळले आहे.
संदीप नाईकांच्या प्रचाराची मदार ही नगरसेवकांवर व पक्षीय पदाधिकाऱ्यांवर विशेषत: नाईक समर्थकांवर अवलंबून आहे तर दुसरीकडे हेच नगरसेवक व समर्थंक गणेश नाईकांचा प्रचार करत असतानाही मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना पराभूत केले होते, याची आठवण मंदा म्हात्रे समर्थकांकडून करून देण्यात येत आहे. नाईकांच्या छावणीत असणारे काही नगरसेवक मंदा म्हात्रे यांच्याशी पडद्याआडून संवाद साधत असतात, हीच बाब नाईकांसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. २०१४ साली गणेश नाईक हे राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवत असताना नाईकांच्याच छावणीतील नेरूळ पूर्व, सानपाडा नोड, नेरूळ एलपीलगतच्या काही राजकिय घटकांनी भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या मंदा म्हात्रे यांच्याकडून मिठाई घेत पडद्याआडून मंदा म्हात्रे यांच्यावर निष्ठा व्यक्त केली होती आणि विशेष म्हणजे यातील अनेक घटक आज संदीप नाईक यांच्या सभोवताली वावरताना दिसत आहे.
निवडणूकीला अजून अडीच पावणे तीन महिन्याचा कालावधी असला तरी तिकिटासाठी नाईक-म्हात्रे गटात सुरु असलेली चुरस, विजय नाहटांनीही निवडणुक लढविण्यासाठी पणाला लावलेली राजकिय प्रतिष्ठा पाहता ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात बेलापुर विधानसभा मतदारसंघाचीच अधिक चर्चा सुरु झालेली आहे.