अमोल इंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राज्यामध्ये व देशामध्ये नवी मुंबई महापालिकेस स्वच्छतेच्याबाबतीत मिळणाऱ्या पुरस्कारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेरूळमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर, चौकाचौकात अनधिकृत होडींगचा पडलेला विळखा, पदपथावर व रस्त्यावर फेरीवाल्यांनी मांडलेला ठिय्या, दुकानांसमोरील मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण पाहता नेरूळच्या बकालपणास महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाचा अतिक्रमण विभाग जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नेरूळवासियांकडून करण्यात येत आहे. फेरीवाल्यांशी अतिक्रमण विभागाचे अर्थकारणाचे प्रेम मासिक स्वरुपात असल्यामुळेच पदपथावर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे नेरूळवासिय खुलेआमपणे सांगत आहेत.
नेरूळ सेक्टर दोन व आठमधील राजीव गांधी उड्डाणपुलाखालील भाग, सेक्टर आठमधील एल मार्केटचा कॉर्नर, साईबाबा हॉटेल चौक, नेरूळ सेक्टर दोनमधील राजीव गांधी उड्डाणपुलापासून ते रेल्वेस्टेशनपर्यतचा रस्ता, तेरणा हॉस्पिटलचा चौक, श्रीगणेश सोसायटीसमोरील परिसर, नेरूळ जिमखाना, पूनम टॉवरच चौक, शाळेची संरक्षक भिंत, सेक्टर १६,१८, २४ मधील चौक, सारसोळे बसडेपो, गणेश-रामलीला मैदानाची तसेच कुकशेतमधील पालिका शाळेची संरक्षक भिंत, नेरूळ सेक्टर सहामधील चौक, पालिका उद्यानालगतचा परिसर, सेक्टर सहा व चारमधील चौक, सारसोळे कोळीवाडा प्रवेशद्वार, बुध्या बाळ्या वैती मार्ग, सेक्टर सहामधील समाज मंदिराचा चौक, हिमालय व वरुण सोसायटीमधील मोकळे मैदान, समाधान चौक, नेरूळ सेक्टर दोनमधील सार्वजनिक उद्यान चौक याशिवाय त्या त्या सेक्टरमधील अंर्तगत व बाह्य रस्ते व बसथांबे, पथदिवे हे अनधिकृत होर्डींग व बॅनरने बाराही महिने व्यापलेले पहावयास मिळत आहेत. याशिवाय वर उल्लेख केलेल्या ठिकाणी तसेच अंर्तगत व बाह्य रस्त्यावर पदपथावर व रस्त्यावर फेरीवाल्यांनी ठिय्या मांडला आहे. या फेरीवाल्यांवर तसेच अनधिकैत होर्डीग व बॅनरवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने नेरूळ पश्चिम परिसराच्या पाचवीलाच बकालपणा पुजलेला पहावयास मिळत असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ सेक्टर सहा व चारमधील चौकात वाहतुक कोंडीची समस्या वाढत असतानाही हाकेच्या अंतरावर असणारे नेरूळ विभाग कार्यालय व या चौकापासून काही पावलावरच असणारे वाहतुक पोलीस केवळ या वाहतुक कोंडीकडे बघ्याच्या भूमिकेतून पाहत असल्याचे गेल्या काही महिन्यापासून पहावयास मिळत आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या टायर विक्रेत्यांनी व हॉटेलचालकांनी मार्जनिल स्पेस व्यावसायिक वापरासाठी पूर्णपणे बळकावलेला असतानाही नेरूळ विभाग कार्यालय या ठिकाणी कारवाई न करता कानाडोळा करत असल्याने यामागे दरमहिन्याला फार मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप नेरूळवासियांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लागलेले असताना हॉटेलमध्ये येणारी वाहने दोन तीन लाईन करून रस्त्यावरच उभी राहत असल्याने दररोज सांयकाळच्या वेळी या ठिकाणी वाहतुक कोंडी होत असते. सारसोळे ग्रामस्थांना मासे पकडण्यासाठी जेटीवर येजा करताना याच वाहतुक कोंडीतून प्रवास करावा लागतो. हॉटेलचालकांमुळे मार्जिनल स्पेस तसेच पदपथवरून चालणे अवघड होत असते. ही वाहतुक कोंडी हटविण्यासाठी वाहतुक पोलिसही फारसे गंभीर नसल्याचे गेल्या काही वर्षात पहावयास मिळत आहे. येथील हॉटेल चालकांचे अतिक्रमण व वाहतुक कोंडी यासाठी महापालिका मुख्यालय ते मुख्यमंत्र्यांपर्यत स्थानिकांनी तक्रारी करुनही समस्येचे निवारण होत नसल्याने फार मोठी अर्थकारणाची भेट स्वरूपातील उलाढाल होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नेरूळ पश्चिमच्या बकालपणाला महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयच जबाबदार असल्याने महापालिकेने येथील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व अधिकारी काढून त्या विभागाला टाळे लावावे. या विभागाला काम न करता नेरूळ पश्चिमेला बकालपणाच ठेवायचा असेल तर महापालिका प्रशासनाने हे पांढरे हत्ती पोसायचे कशाला?, असा प्रश्न नेरूळवासियांकडून विचारला जात आहे. वाहतुक कोंडी ही वाहतुक पोलिसांसमोरच होत असल्याने व नो पार्किंगच्या फलकासमोरच वाहने उभी राहत असल्याने राज्याच्या गृह विभागाने या ठिकाणाहून वाहतुक पोलिस हटविण्याचे निर्देश देण्याची मागणी नेरूळवासियांकडून होत आहे.