स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या शिक्षण विभागात काम करणाऱ्या तासिका शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाशशिंदे यांना लेखी निवेदन सादर करताना शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा ऊहापोह केला आहे.
सन 2022 साली तत्कालीन आयुक्तांनी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त कर्मचारी/ अधिकारी यांना मासिक एक दिवसाची किरकोळ रजा मंजुर केली होती. मासिक सुट्टी कामगार कायद्यान्वये असल्याने ती घड्याळी तासिका शिक्षकांना देय आहे. तसेच या शिक्षकांमध्ये महिला शिक्षिकांचे प्रमाण जास्त असल्याने मासिक सुट्टी हा त्यांचा अधिकार होतो. सबब आपल्याच कार्यालयाचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावे. सदर तासिका कर्मचारी पालिकेचे कर्मचारी असल्याने पालिकेने त्यांना लवकरात लवकर ओळखपत्र देण्याबाबत कार्यवाही करावी.रविवार अथवा सुट्टीच्या दिवशी सर्व्हेक्षण किंवा अन्य तत्सम प्रकारची कामे शाळेमार्फत घड्याळी तासिका शिक्षकांना लावली जातात, मात्र त्या दिवसाचे वेतन दिले जात नाही. सदर शिक्षक होतकरु व गावावरुन नोकरीच्या शोधात शहरात आले असल्याने कामाची गरज आहे व ते काम आर्वजून करतात. मात्र त्यांना कामाचा मोबदलाही दिला गेला पाहिजे. सदर मागण्यांवर सकारात्मक विचार करून संबंधित तासिका शिक्षकांना न्याय देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.
आदिवासी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार घड्याळी तासिका शिक्षकांचे वेतन प्राथमिकसाठी 170 रुपये व माध्यमिकसाठी 190 रुपये देणेबाबत शासन निर्णय याच शैक्षणिक वर्षात दिनांक 28 जुन 2024 रोजी निर्गमित केला आहे. ग्रामीण भागात शाळेतच निवासी राहणाऱ्या तथा तेथेच अन्न पाण्याची सोयी-सुविधा उपलब्ध असणांऱ्या शिक्षकांना 170 व 190 रुपये शासन देत असेल तर मुंबईसारख्या महागड्या शहरामध्ये जिथे घरभाडे हजारो रुपयांमध्ये आहे. जेथे शासन जवळ जवळ 50% महागाई भत्ता कायम कर्मचाऱ्यांना देत आहे. अशा अवस्थेत तासिका शिक्षकांनी जगावे कसे? असा प्रश्न आहे. गणपती, दिवाळी, इतर सण उत्सव, शासकीय सु्?ट्या यामधून 10 ते 15 दिवस शाळा भरत असते. पूर्ण मे महिना व अर्धा जून महिना शाळा बंदच असते आणि इतर महिन्यांमध्ये शाळा कुठे भरते? तरी 18 ते 20 हजार रुपये मानधन मिळते. जे की याच शाळेत कार्यरत सफाई कर्मचारी यांच्यापेक्षा कमी आहे. सबब घड्याळी तासिका शिक्षकांचे महानगरपालिकेने निदान प्रतितास 50 रुपये वाढ करुन प्राथमिक घड्याळी शिक्षकांसाठी 175 रुपये व माध्यमिक घड्याळी तासिका शिक्षकांसाठी 200 रुपये मानधन करण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडेकेली आहे.