सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com -८३६९९२४६४६
नवी मुंबई : संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने आज सीबीडी-बेलापूर येथील वारकरी भावनात पार पडलेल्या दहाव्या मोफत महारोजगार मेळाव्याचा ४५० उमेदवारांना लाभ झाला असून १८० उमेदवारांची तात्काळ निवड करण्यात आली आहे. तर काहींच्या मुलाखती होवून त्यांची नोंदणी निवड प्रकीयेच्या पुढील टप्प्यासाठी करण्यात आली आहे. माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तपत्रांचे वाटप करण्यात आले. या महारोजगार मेळाव्यासाठी ७८ कंपन्यांनी नोंदणी केली होती.
बीपीओ, केपीओ, आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील ५० कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. विविध आस्थापनांमध्ये ६३०० रोजगारांची संधी उपलब्ध होती. संदीप नाईक यांच्या हस्ते या महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संदीप नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबईमध्ये रोजगाराच्या विपुल संधी असून या संधी शहरातील उमेदवारांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहे. भविष्यात शहरातील प्रत्येक नोडमध्ये रोजगार मेळावे भरविण्यात येतील. बेलापूर सेक्टर १५ येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयामध्ये रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दैनंदिन मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. नवी मुंबईमध्ये मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. नवी मुंबईला लागूनच पुढील एक दीड वर्षात आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने डेटा सेंटर उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी नवी मुंबईची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या संधी प्राप्त करून घेण्यासाठी तरुण आणि तरुणी यांनी जागरूक राहिलं पाहिजे. विविध उद्योगांमधून आणि आस्थापनांमधून पाहिजे असलेलं मनुष्यबळ आणि उपलब्ध मनुष्यबळ यांची सांगड घातली तर अनेकांना रोजगार प्राप्त होतील असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला. लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी कामगारांचे नेतृत्व म्हणून नवी मुंबईतील कारखान्यांमधून स्थानिकांना रोजगार कसा प्राप्त होईल याकरता अविरत परिश्रम घेतले. कामगार आणि कंपन्या दोन्ही जगल्या पाहिजेत, अशी समतोल भूमिका त्यांची होती. महारोजगार मेळाव्यांमधून त्यांचा हाच विचार पुढे नेला जातो आहे. रोजगार प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच तरुण आणि तरुणींनी स्वयंरोजगार स्टार्टअप कडे देखील वळावे. त्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य आणि पाठबळ आपण देऊ, अशी ग्वाही संदीप नाईक यांनी दिली. बेलापूर येथील मार्गदर्शन केंद्रातून उमेदवारांना रोजगार मिळवण्यासाठी मुलाखतीची तयारी घेण्यापासून ते आवश्यक सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती देऊन नवी मुंबईतील रोजगार इच्छुकांसाठी निरंतर महारोजगार मेळावे आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योग जगतातील सुप्रसिद्ध तज्ञ संदीप दांडेकर यांनी मार्गदर्शन करताना अधिक चांगल्या प्रकारे उमेदवारांनी आपल्या कौशल्यांचा विकास करीत राहायला पाहिजे, असा सल्ला दिला. बदलांसोबत जातानाच इतरांपेक्षा आपण काय वेगळं देऊ शकतो याचा विचार करण्याचे आवाहन केले. संदीप नाईक यांचे नेतृत्व प्रेरणादायी असून लोककल्याणासाठी व्यापक आणि सूक्ष्म पातळीवर विचार करण्याची त्यांची क्षमता असल्याचे नमूद केले.
महारोजगार मेळाव्याप्रसंगी माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, स्थायी समितीचे माजी सभापती डॉक्टर जयाजी नाथ, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती नेत्रा शिर्के, भाजपा महामंत्री सुरज पाटील, माजी नगरसेवक अशोक गुरखे, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधुरी सुतार, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेढकर, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष राजेश राय, विनीत पालकर, माजी नगरसेविका मीरा पाटील, राजश्री कातकरी, शिरीष म्हात्रे, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, माजी नगरसेवक विशाल डोळस, सुनिकेत हांडेपाटील, अशोक नरबागे, भाऊ भापकर, अमित मढवी, जगन्नाथ कोळी, दीपक जोशी, मोतीराम पालकर, राजेश ठाकूर, सुभाष गायकवाड, बाळकृष्ण बंदरे, चंद्रशेखर भोपी, गणेश कमळे, मनोहर बाविस्कर, सुरेश गायकवाड, आप्पा मुळे, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, श्री दयाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले.