अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार ते सानपाडा पामबीच भागातील केसर सॉलिटर बिल्डींगपर्यंत महापालिका प्रशासनाने सर्व्हिस रोडची निर्मिती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापलिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर चार परिसरातील वाधवा सोसायटी ते सानपाडा पामबीच भागातील केसर सॉलिटर बिल्डींगपर्यंत महापालिका प्रशासनाने सर्व्हिस रोड तयार करावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहोत. या रस्ता निर्मितीसाठी महापालिका प्रशासनाने नकाशाही बनविला असून महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी रस्ता बनविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदाही तयार केली होती. परंतु कामास कार्यवाही न झाल्याने चौकशी केली असता, ती फाईलच महापालिका प्रशासनातून गहाळ झाल्याचे समजले. या रस्त्यासाठी बांधकामादरम्यान असलेली नैसर्गिक कारणे पाहता त्यासाठी केंद्र व राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्याचे आम्हालाही मान्य आहे. तथापि नेरूळ व सानपाडामधील दळणवळणासाठी हा रस्ता अंत्यत जवळचा असून हा मार्ग झाल्यास वेळेची व इंधनाची बचत होईल. लोकांनाही या रस्त्याची गरज आहे. या दोन्ही परिसरात ये-जा करण्यासाठी पामबीच मार्ग तसेच नेरूळ जुईनगरमधील अंर्तगत रस्ता हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तथापि या ठिकाणी होत असलेली वाहतुक कोंडी व वेळेचा अपव्यय पाहता या रस्त्याच्या कामाला महापालिका प्रशासनाने गती द्यावी व रस्ता लवकरात लवकर बनविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.