महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा महापालिका आयुक्तांना इशारा
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन विभागात काम करणाऱ्या रोजंदारी तसेच ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करुन त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून मागणी केली असून सुविधा न मिळाल्यास २३ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करायचे व त्यानंतर कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये रोजंदारी तसेच ठोक मानधनावर वाहक आणि चालक कार्यरत आहेत. प्रशासनामध्ये आज ना उद्या आपली सेवा कायम होईल या आशेवर हे कर्मचारी गेली १५ ते १६ वर्षे इमानेइतबारे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांची सेवा तर कायम झाली नाहीच, पण त्यांना पगारवाढही प्रशासनाने दिलेली नाही. त्यांच्या समस्यांचे निवारण होत नाही, त्यांना माफक प्रमाणावर सुविधा उपलब्ध करुन देण्यासही प्रशासनाने आजवर टाळाटाळच केली आहे. हे वाहक-चालक असलेले कर्मचारी आपल्या सेवेत दररोज हजारो प्रवाशांची ने-आण करण्याची सेवा करत आहेत. या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने मेडिक्लेमचीही सुविधा दिलेली नाही. रस्त्यावर प्रवासी सुविधा देताना बसला अपघात होऊन कोणी कर्मचारी घरी बसल्यास त्यास आजारपणावरील उपचाराचा खर्चही भेटत नाही. त्या कालावधीतला पगारही संबंधित कर्मचाऱ्यांना भेटत नाही. प्रशासनाकडे विचारणा केल्यास, तशी तरतूद नसल्याचे सांगण्यात येते. तशी तरतूद नसेल तर प्रशासनाने ती तरतूद करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी नियम, तरतूदी असतात, नियम-तरतूदीसाठी कर्मचारी नाही. जे प्रशासनाच्या प्रवासी सेवेचा डोलारा सांभाळतात, त्यांच्यासाठी तरतूद करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे आणि प्रशासन या जबाबदा रीपासून आपले अंग झटकू शकत नाही. घरातील कोणी आजारी पडल्यास कर्मचाऱ्याला नातेवाईकांकडे, मित्रांकडे पैसे उसने मागावे लागतात अथवा बाहेरुन व्याजाने पैसे काढावे लागतात. पाच वर्षे लोटली तरी पालिका प्रशासनाकडून या चालक-वाहकांना साधा ड्रेसही देण्यात आलेला नाही. अनेक चालक-वाहक फाटक्या कपड्यात काम करताना पहावयास मिळतात. स्वमालकीचे धरण व राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणना होणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनासाठी ही भूषणावह बाब नाही. २०१० मध्ये ठाणे कामगार आयुक्तांच्या आदेशाने आणि परिवहन समिती महासभेच्या ठरावानुसार परिवहन उपक्रमातील ठोक व रोजंदारीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट कायम करणे आणि २०१० ठरावानुसार कनिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणे, त्यांच्या आरोग्यसुविधेसाठी मेडिक्लेमची सुविधा देणे, कामासाठी ड्रेस देणे, आजारपणाची भरपगारी रजा देणे या मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. आम्ही यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या मागण्या लवकरात लवकर मान्य करुन त्यांना न्याय द्यावा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी काळ्या फिती लावून काम केले जाईल. त्यानंतरही प्रशासनाला जाग न आल्यास ‘कामबंद आंदोलन’छेडले जाईल, असा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.